Malegaon Fort Home : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी व त्यांचे विचार भावी पिढीला समजण्यासाठी नाशिकच्या (Nashik) मालेगावातील एका शिवभक्ताने स्वतःच्या घराला गड किल्ल्यांचे स्वरूप देत महाराजांविषयी असलेले अनोखे प्रेम व्यक्त केलं आहे..या शिवप्रेमीची आणि गड - किल्ल्याची प्रतिकृती असलेल्या अनोख्या घराची परिसरात चर्चा आहे.
नाशिकच्या मालेगावातील (Malegaon) डॉ.संतोष पाटील या (Santosh Patil) शिवभक्ताने गड - किल्ल्यांची प्रतिकृती असलेले हे घर बांधले आहे. घराच्या बाहेरील बाजूस बुरुज पद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे. प्रवेशद्वारालाच तोफा, आणि भिंतीवर ढाल - तलवार प्रतिकृती बसविण्यात आली आहे. तर समोरच्या बाजूस भिंतीवर 'राजमुद्रा ' साकारण्यात आली आहे. घराच्या उंच अशा छतावर डौलाने फडकणारा भगवा ध्वज व एक तोफ देखील टॉवरवर ठेवण्यात आली आहे..घराच्या चारही बाजूस किल्ल्यावरील (Fort Home) बुरुज व तटबंदी असल्यासारखे बांधकाम करण्यात आले आहे. संपूर्ण घराला किल्ल्यावरील दगड मातीचा रंग व भगव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. घरातील जिन्यावरून ये-जा करतांना एखाद्या किल्ल्यावर आपण जात असल्याचा आभास देखील होतो. प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावण्यात आली आहे..
दरम्यान घरात प्रवेश केल्यानंतर बैठक हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन होते. हॉलमधील संपूर्ण एका भिंतीवर छ्त्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असून याच हॉलमध्ये आलेल्या अभ्यांगतांना बसण्यासाठी अष्टप्रधान मंडळाला बसण्यासाठी सिंहासनासारख्या खुर्च्या देखील ठेवण्यात आल्या आहेत..तर विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सज्जनगड, तोरणा, पुरंदर, रायगड, शिवनेरी, पन्हाळा आदी गड - किल्यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत..घरातील दुसऱ्या हॉलमध्ये तुळजा भवानी, माँ जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, माणकोजी दहातोंडे, जिवाजी महाला, नेताजी पालकर, मुरारबाजी देशपांडे, शिवा काशिद, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शेलार मामा आदींसह ज्यांनी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली अशा सर्व मावळ्यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत..
छशिवाजी महाराजांचा इतिहास, गड - किल्ले यांची माहिती येणाऱ्या पिढीला व्हावी, महाराजांचे विचार सदैव आपल्या पाठीशी रहावे,महाराजांचे विचार पुढच्या पिढीला आत्मसात व्हावे हा एकमेव उद्देश हे घर उभारण्यामागे असल्याचे डॉ संतोष पाटील सांगतात..नुसतेच गड किल्ल्यासारख्या भिंती उभारल्या असे नाही तर या घराचे पावित्र्य राखण्याचे काम देखील डॉ.संतोष पाटील यांनी केले आहे..आपल्या घराला महाराजांचा दरबार म्हणून मानणारे डॉ. पाटील यांनी घरात प्रवेश करतेवेळी ' गुटखा व दारू पिऊन येणाऱ्यास घरात प्रवेश नाही ' असा मजकूर लिहून ठेवला आहे, तसेच घराच्या कंपाऊंड जवळच पादत्राणे काढण्याची व्यवस्था केली आहे..त्यामुळे घराचे पावित्र्य जपण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला आहे.
दादा भुसेंकडून कौतुक
राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेकांनी या घराला भेट देत कौतुक केले आहे. ते फेसबुक पोस्टद्वारे लिहतात कि, मालेगांव शहरातील भायगांव शिवार येथील शिवप्रेमी डॉ.संतोष पाटील यांच्या गड-किल्ला स्वरुपाच्या घराला भेट दिली. विशेष म्हणजे घरात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ , छत्रपती संभाजी महाराज, सुभेदार मावळे तसेच गड-किल्ल्यांचे छायाचित्र लावले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतःच्या घराला गड किल्ल्यासारखी रंगरंगोटी करुन एक वेगळाच आदर्श घेत त्यांनी हे घर तयार केले आहे. अतिशय सुंदर व सुबक पद्धतीने गड - किल्ल्यांची उभारणी करावी, तशी या घराची उभारणी केली असल्याने छ.शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव पाहण्यासाठी या घराला एकदा तरी भेट द्यायला हवी, असे आवाहन डॉ.संतोष पाटील यांनी केले आहे.