Nashik Makar Sankranti 2023 : काही दिवसांपूर्वी औरंगाबाद (Aurangabad) शहरात पिवळ्या रंगाची साडी, बांगड्या घेण्यास महिला नकार देत असल्याचे समोर आले होते. याच कारण म्हणजे यंदाची संक्रात (Sankranti 2023) ही पिवळ्या रंगावर (Yellow Color) असल्याने हा समज पसरला आहे. याचबरोबर सोशल मीडियात देखील याबाबत मॅसेज व्हायरल होत असून याबाबतचा दावा महाराष्ट्र अंनिसने (ANIS) खोडून काढला आहे.
नववर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रातीकडे पाहिले जाते. यंदा हा सण रविवारी म्हणजेच 15 जानेवारीला आला आहे. तर यंदा संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा आहे. ही संक्रांत कुमारी अवस्थेतील असून, पिवळे वस्त्र नेसलेली आहे. पिवळ्या रंगाने रंगवलेल्या वस्तू परिधान करू नये, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे पिवळ्या रंगावरून सोशल मीडियात (Social Media) उधाण आले आहे. यंदाची संक्रात हि पिवळ्या रंगावर असून ती सोबत संकटे घेऊन आली आहे. तिने परिधान केलेल्या वस्त्राचा पिवळा रंग हा अशुभ असल्याने त्रासदायक असल्याचे मॅसेजद्वारे सांगण्यात येत आहे. मात्र हा खोडसाळ प्रकार असून संक्रात आनंदाने साजरी करा असे आवाहन अंनिसकडून करण्यात आले आहे.
तिळगुळ घेण्या घेण्याच्या निमित्ताने समाजातील सुसंवाद वाढावा, मनोमिलन घडावे, प्रेम-स्नेह वृद्धींगत व्हावा, वैचारिक घुसळण व्हावी, अशा स्वरूपाच्याच वाणाची देवाण-घेवाण व्हावी, हा विधायक उद्देश मकर संक्रांत साजरी करण्यामागे आहे. आजच्या अगतिक, अस्थिर, असुरक्षित समाजात एकोपा वाढविणाऱ्या, मानसिक आधार देणाऱ्या, समन्वय व सहिष्णुता यांची रुजवणूक करणाऱ्या या मूल्यांची फार मोठी गरज आहे. ती संक्रांती सारख्या सण-उत्सवातून जाणीवपूर्वक भागवली जावी. म्हणून संक्रांत साजरी करताना अवैज्ञानिक कर्मकांडांना, अंधश्रद्धांना, अफवांना अजिबात थारा देऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.
नेमकं काय म्हटलं मॅसेजमध्ये?
यंदाची संक्रात भारी आहे. अमुक दिशेकडून ती तमुक दिशेकडे जात आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्र परिधान केलेले आहे. तिच्या हाती अमुक एक शस्त्र असून, तिची नजर तमुक दिशेला आहे. ती ज्या दिशेकडून निघाली आहे. तेथील समस्या सोबत घेऊन निघाली आहे. त्यामुळे ज्या दिशेकडे जात आहे, तेथील लोकांना संकटांचा सामना करावा लागणार आहे. तिने परिधान केलेल्या वस्त्राचा पिवळा रंग हा अशुभ आहे. म्हणून त्या रंगाचे वस्त्र जो परिधान करेल, त्याला त्रास होणार आहे. असा समजही नागरिकांसह सोशल मिडीयात व्हायरल होत आहे. मॅसेजमधील या सर्व अवैज्ञानिक गोष्टी आहेत. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या कालावधीत सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजेच त्याला उत्राण किंवा संक्रांत म्हणतात. हा कालावधी थंडीचा असल्याने या काळात प्रोटीन युक्त उष्ण व पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरत असल्याचे अंनिसने म्हटले आहे.