Sharad Pawar Nashik : अनिल देशमुख आणि  संजय राऊत यांना विनाकारण तुरुंगात डांबलं, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) एक वर्ष तुरुंगात होते. त्याचबरोबर संजय राऊत (Sanjay raut) देखील तुरूगांत होते. नवाब मलीक आजही जेलमध्ये आहेत, राज्य पातळीवर काम करणाऱ्या या नेत्यांना पाहता त्यांच्या भुमिकेचा विचार त्यांनी करावा, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपले मत मांडले. सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी संस्था नोंदणी करताना आता भाजपच्या जिल्हाध्यक्षांची शिफारस आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यावर पवार म्हणाले की, केंद्राच्या विसंगत राज्य सरकारचे प्रतिनिधी धोरण मांडत आहे. भाजपाने त्यांच्या पक्षात काय करावे त्यांचा प्रश्न असून केंद्राच्या सहकार परिषदेत सावेंचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. 


तसेच महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा ठराव भाजपच्या बैठकीत करण्यात आला. यावर पवार म्हणाले की, अनिल देशमुख एक वर्ष जेलमध्ये होते. संजय राऊत देखील जेलमध्ये होते. नवाब मलीक आजही जेलमध्ये आहेत. राज्य पातळीवर काम करणाऱ्या या नेत्यांना पाहता त्यांच्या भुमिकेचा विचार त्यांनी करावा, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. काँग्रेसमध्ये वाद होत आहेत. यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद होत आहेत यावर ते म्हणाले की, मविआमध्ये कुठलाही वाद नाही, चर्चा होत असतात. 


शरद पवार पुढे म्हणाले की, मुंबई मनपाची निवडणूक पाहून मोदी महाराष्ट्रात येत आहेत, हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देत असतील तर काही हरकत नाही, पण ते येऊन राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा. तसेच नाना पटोलेंनी राजीनामा देऊन एक वर्ष झाला, आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, पटोलेंनी राजीनामा देतांना सगळ्यांना विश्वासात घेतले नाही, एवढीच व्यथा पण आता तो विषय संपला असल्याचे पवार म्हणाले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजित दादा मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवत आहेत. यावर पवार म्हणाले की, अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता. आज आमच्याकडे शक्ती नाही, त्यामुळे सध्या शक्य नसल्याचे शरद पवार म्हणाले. 


कायदा सुव्यवस्थेबाबत फडणवीसांना टोला 


महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था चांगली असते, मात्र काही दिवसांपासून ज्या पद्धतीने हल्ले किंवा गुन्ह्याच्या घटना समोर येत आहे. त्यावरून कायदा व्यवस्था बिघडत चालली आहे. ज्या प्रकारे पत्रकारांवर हल्ले होते आहेत, त्यावर महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यावरुन ज्यांची जबाबदारी आहे. ते याबाबत कितपत लक्षात घेतात याबाब शंका असल्याचे सांगत अप्रत्यक्ष टोला फडवणीसांना या वेळी पवारांनी लगावला आहे. मागच्या काळात भाजपा नेत्यांचे पुण्यात वाढलेले दौरे म्हणजे आमच्या कार्यकत्यांचे काम चांगले सुरु असल्याचे लक्षण असून जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यांवर काही आक्षेपार्ह नाही, याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.