Pune Bypoll election :  कसबा (kasba bypoll election) आणि चिंचवड (chinchwad bypoll election) विधानसभा मतदार संघाची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही मतदार संघाच्या उमेदवारांबाबतचा निर्णय उद्या (4 फेब्रुवारी) जाहीर करु, असं देखील ते म्हणाले. महाविकास आघाडीची आज मुंबईत कसबा आणि चिंचवड मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दोन्ही मतदार संघाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत तिन्ही पक्षांनी एकत्र येत चर्चा केली आहे. आमचे आणखी काही मित्र पक्ष आहे. त्या सगळ्या मित्र पक्षाशी चर्चा करणं आवश्यक आहे. त्या सगळ्यांशी आम्ही आज चर्चा करणार आहोत. त्यासोबतच पक्षाच्या वरिष्ठांशी देखील चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असं ते म्हणाले. आमचे घटक पक्ष आहेत त्यांना आम्ही प्रत्येक निर्णयात सहभागी करुन घेतो. ही प्रथा गेली अनेक वर्षांपासून सुरु आहे, असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. 


नाना पटोले म्हणाले की, दोन्ही मतदार संघाच्या निवडणुका एकत्र आणि एकजुटीने लढणार आहोत. त्यासोबतच दोन्ही मतदार संघआत महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडूण येईल, यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. कसब्यात कोणत्या पक्षाला जागा दिली जाणार आणि चिंचवडमध्ये कोणत्या पक्षाला जागा दिली जाणार यासंदर्भातील घोषणा उद्या करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही मतदार संघाच्या जागा महाविकास आघाडीच जिंकेल, असा दावाही त्यांनी केला आहे. 


आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदार संघाची जागा रिक्त झाली तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत इच्छूक उमेदवारांची मोठी यादी तयार झाली होती. दोन्ही मतदार संघात तिन्ही पाक्षाने दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघात महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरु आहे. त्यातच महाविकास आघाडीने मुंबईत बैठक घेऊन एकत्र निवडणूक लढवणार आणि उमेदवार जिंकून आणणार अशी घोषणा केली आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघात नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.