Nashik News : महाराष्ट्र राज्यात असलेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्यासाठी साधू महंत कमालीचे आक्रमक झाले असून या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या (Nashik) रामकुंडावर ही बैठक पार पडत असून यात सर्व आखाड्यांचे महंत तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थिती दर्शवली. या बैठकीत राज्य सरकारकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.  


गेल्या काही दिवसांपासून धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krushna Shasri) आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यात जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोधात साधू संत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये याबाबत बैठक होत असून जादूटोणा विरोधी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे नागपूरमध्ये आगमन झाले होते. यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून वाद निर्माण झाला होता. अंनिसचे श्याम मानव (Shyam Manav) यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Bageshwer Dham) यांना खुले आव्हान दिले. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमध्ये केलेले दावे सिद्ध करून दाखवावे असे थेट जाहीर आव्हान केले होते. चमत्कार दाखवा आणि तीस लाख रुपये मिळवा, असे आव्हान दिले होते. 


मात्र यानंतर दिलेल्या धीरेंद्र कृष्णशास्त्री यांनी नागपूरातून काढता पाय घेतला. नियोजित वेळेच्या आधीच म्हणजे तीन दिवसा अगोदरच नागपुरातून ते रायपूरमध्ये रवाना झाले. त्यामुळे अंनिसने या विरोधात तक्रार दाखल केली. हे सगळं प्रकरण सध्या गाजत असून याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एकत्र आले आहेत. नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री जोशी यांनी आवाहन करत नाशिकमधील साधू म्हणून त्यांना एकत्र केले आहे. त्यानुसार नाशिकच्या रामकुंड परिसरात बैठक होणार असून या बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या बैठकीत सर्व आखाड्याचे साधु संत, संन्यासी, पुरोहित संघ तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना हजर राहणार असून जादू टोणा कायद्याला विरोध दर्शवणार आहेत. 


51 लाख रुपयांचं पारितोषिक


नाशिकमधील सर्व साधू महंत एकवटले असून राज्य सरकारला निवेदन करणार आहे की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा महाराष्ट्रात ना लवकरात लवकर रद्द करावा कारण या कायद्याचा जो उद्देश आहे हा कुठेतरी भरकटला आहे. फक्त आणि फक्त हिंदू धर्मगुरूंना टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर रद्द व्हावा अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री जोशी यांनी केली आहे. तसेच अनेकदा मौलाना, पादरी, भंते यांच्याकडून चमत्कार सिद्ध करावयाचे दावे केले जातात. ते त्यांनी सिद्ध करून दाखवले तर आम्ही 51 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करतो, असं चॅलेंजही अनिकेत शास्त्री यांनी दिलं आहे.