Nashik News : राज्यात सर्वत्र रस्त्यावरील खड्डयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिककरांची खड्ड्यापासून मुक्ती करण्यासाठी नाशिक महापालिकेनं शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याची घोषणा केली आहे. मात्र रस्त्याच्या कामांची संथ गती, कांद्यात होणाऱ्या अपघातांनी नागरिक मेटाकुटीला आले असून नवे रस्ते करायचे तेव्हा करा, मात्र आज खड्डयांच्या त्रासातून मुक्त करा, अशी मागणी नाशिककर करत आहेत..
जशी सत्ता बदलल्यावर नवे पदाधिकारी मोठमोठ्या घोषणा करतात, तसेच काहीसे नाशिक शहरात घडत आहे. नव्यानेच नाशिक महापालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळणारे मनपा आयुक्त अशोक करंजकर यांनी नाशिककरांना खड्डयांपासून मुक्ती देण्यासाठी शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे स्वप्न दाखविले. मात्र ही घोषणा कधी आणि कशी पूर्ण होणार याबाबत महापालिकेकडे कुठलाच आराखडा सध्यातरी नाही. सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंगरोड करण्यासाठी निधी नसल्याचे महापालिकेनं नुकतेच जाहीर केले. त्यामुळे रस्ता काँक्रिटी करणासाठी शेकडो कोटींचा निधी कसा उभा राहणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
नाशिक शहरात सध्या 2300 किलोमीटरचे रस्ते असून त्यातील 300 किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवून टप्याटप्याने रस्ते सिमेंट काँक्रेटचे रस्ते केले जाणार असून त्यासाठी मनपाच्या बजेटमध्येही तरतूद केली जाणार आहे. नाशिक शहरात आजही काही ठिकाणी काँक्रीटचे रस्ते बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र त्याची गती अत्यंत संथ आहे. एक-एक वर्ष उलटून जाते, तरीही रस्ते होत नसल्यानं परिसरातील नागरिकांना, वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकूणच महापालिकेच्या कामाचा वेग पहाता पुढील चार पाच वर्षात तरी नाशिककरांना खड्यापासून मुक्तता मिळण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे एकीकडे संथ गतीच्या कामाने होणारा त्रास आणि दुसरीकडे खड्यातून कसरत करत मार्ग काढताना होणारा मनस्ताप असा अशा दुहेरी कात्रीत नाशिककर अडकले असल्यानं आधी खड्डे बुजवून नाशिकराचे हाल कमी करा, अशी मागणी होत आहे..
तरीही खड्डे बुजविण्याचे काम संथच....
मागील पावसाळ्याचा विचार केला तर नाशिक शहरच खड्ड्यात गेले की काय? असा प्रश्न नाशिककर विचारत होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात असे हाल होऊ नयेत, म्हणून नाशिक प्रशासनाने सुरवातीपासून खबरदारी घेतली आहे. मात्र नाशिक शहरात अद्याप धुवांधार पाऊस नसल्याने सध्यातरी काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र तरीही खड्डे बुजविण्याचे काम वेगाने होत नाही. दुसरीकडे नाशिक शहरातील रस्ते क्रॉंक्रिट करणार असल्याचे आश्वासन आयुक्तांकडून देण्यात आले आहे. मात्र नागरिकांच्या अपघाताच्या संख्येतही वाढ होत असल्यानं लोकप्रतिनिधीप्रमाणे घोषणाबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करून नाशिककरांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.
इतर संबंधित बातम्या :