Nashik Rain : दोन दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने आज सायंकाळी तीन ते चार वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावत दिवाळी (Diwali) खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नाशिककरांना (Nashik) झोडपून काढले. यावेळी बाजारात गर्दी असल्याने अचानक आलेल्या परतीच्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी बाजारपेठेत आलेल्या आकाशकंदील, पणत्या बाजारावर पावसाने पाणी (Rain) फेरले. 


दिवाळी (Diwali) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नाशिककरांमध्ये उत्साह आहे. मागील दोन दिवस पाऊस न झाल्याने तसेच थंडीही जाणवू लागल्याने आता पाऊस थांबला. अशी स्थिती असताना मात्र आज दुपारी परतीच्या पावसाचे आगमन झाले. यावेळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना दुकानांचा आसरा घेण्याची वेळ आली. नाशिकसह राज्यभरात दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. विकेंडला तर बाजारपेठा खरेदीदारांच्या गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळाले. आजही नाशिककरांनी वेळ काढून दुपारी शालिमार, मेनरोड या मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी केली. मात्र पावसाचे आगमन झाल्याने चांगलीच तारांबळ झाली. 




दरम्यान नाशिक शहरात आज दुपारपासूनच ढगाळ वातावरण तयार झले होते. त्याचप्रमाणे हवेत गारवा जाणवत होता. मात्र पाऊस येण्याची चिन्हे कमी होती. मात्र नाशिककरांचा अंदाज फोल ठरवला आहे. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांचा हिरमोड झाला. अनेक ठिकाणी बाजारात पाणी घुसल्याने बाहेर दुकान थाटलेल्या विक्रेत्यांना धावपळ करावी. आकाशकंदील व पणत्यांकसह इतर दिवाळीचे साहित्य बाहेर असल्याने पावसामुळे साहित्य दुकानात घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. शिवाय काही ठिकाणी पावसात हे साहित्य भिजल्याने विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 


दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज 
दरम्यान दिवाळी सणासाठी बाजारपेठ सज्ज झाली असून सणासाठी नागरिकांनी फराळ, दिवाळी साहित्य, लहान मुलांना कपडे, मोबाईल, सोनं खरेदीसाठी सुरुवात केली आहे. दसऱ्याला दुचाकी, चारचाकी गाड्या तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीविक्रीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याने आता दिवाळीमध्ये व्यापाऱ्यांनी जोर लावला आहे. आजच्या घडीला अनेक जण ऑनलाईन शॉपिंग करण्यावर भर देतात. मात्र नाशिकच्या मेनरोड, शालिमारसह इतर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर रेडीमेड कपडे खरेदीसाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे. 


राज्यभरात परतीच्या पावसानं थैमान
दरम्यान राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घातले असून अनेक भागात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. पुणे, मुंबई, पालघर, नागपूर, ठाणे या शहरात पाऊस चांगलाच बरसत आहे. तर नाशिकमध्ये मात्र दोन दिवस म्हणेजच विकेंडला पावसाने उघडीप दिल्याने नाशिककरांना आजही उघडीप देणार कि काय? असा प्रश्न होता. मात्र दुपारी पावसाने हजेरी लावल्याने नाशिककरांच्या खरेदीवर पावसाने पाणी फेरले. त्यामुळे पावसाचे दिवस अजून संपलेले नसल्याचे चित्र दिसत आहे. तर राज्यभरात परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे.