Nashik Shivsena : 'बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी संजय राऊत (Sanjaya Raut) यांनी केली आहे. मात्र आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की संजय राऊत यांना बाजूला करा, पुन्हा एकदा तीच शिवसेना तुम्हाला दिसेल, असा विश्वास अजय बोरस्ते यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे याला उत्तर देताना संजय राऊत हे ढाण्या वाघ आहेत. तुमच्या सारखे भागूबाई नाही, अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला आहे, असं ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे.
'एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है, शिवसेनेचा (shivsena) विजय असो, आवाज कुणाचा शिवसेनेचा' अशा घोषणांनी नाशिक (Nashik) शहर परिसर दणाणून गेला. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी तोफ डागली आहे. यावेळी म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. हा स्थापना दिवस आमच्या शिवसैनिकांसाठी कमी नाही. मात्र काही काळापासून शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या (NCP) दावणीला बांधलेली होती. त्यामुळे शिवसैनिक नाराज होता. हा शिवसैनिक आयुष्यभर यांच्याशी भांडला. त्यांच्याबरोबर नेते मांडीला मांडी लावून बसत असतील, मात्र कार्यकर्त्याला हे पसंत नव्हतं."
"याच भावना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ओळखून बाळासाहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना उभी केली आहे. यावर निवडणूक आयोगाने देखील शिक्कामोर्तब केला आहे. शिल्लक सेनेतील जे काही राहिले असेल ते देखील लवकरच शिवसेनेत येतील," असेही बोरस्ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन एकनाथ शिंदे काम करत असून ते जनतेला पटत आहे, असा मुख्यमंत्री कोणी बघितला नाही. याचा आम्हाला अभिमान आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी संजय राऊत यांनी केली आहे. मात्र आमची खूप इच्छा आहे की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की संजय राऊत यांना बाजूला करा, पुन्हा एकदा तीच शिवसेना तुम्हाला दिसेल, असा विश्वास देखील यावेळी बोरस्ते यांनी व्यक्त केला.
वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम
शिवसेनेचा वर्धापन आज राज्यभरात उत्साहात साजरा होत असून दोन्ही गटाकडून ठिकठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल आहे. नाशिकमधून शिंदे गटाचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईला गोरेगावकडे रवाना झाले आहेत तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या वतीने गोरगरिबांना लाडू वाटप, रुग्णांना ब्लॅंकेट वाटप असे उपक्रम राबवले जात आहेत. वर्धापनदिनीच नाशिकमध्ये शिवसेनेच्या दोन गटात जुंपल्याचं बघायला मिळाल आहे. उद्धव साहेब संजय राऊतांना बाजूला करा आपण पुन्हा उभे राहू अशी भावना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे याला उत्तर देताना संजय राऊत हे ढाण्या वाघ आहेत. तुमच्या सारखे भागूबाई नाही, अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे यांना तुम्ही खंजीर खुपसला आहे, असं ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे.