Nashik News : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोग्य यंत्रणेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. त्याचबरोबर आदिवासी बांधवांच्या अनेक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे आंदोलन करण्यात आले. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एल्गार संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


दोन दिवसापूर्वी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील अंजनेरी आरोग्य केंद्र आरोग्य (Anjneri Health Center) विभागाचे कर्मचारी उपलब्ध नसताना आईलाच आपल्या मुलीची प्रसूती करावी लागल्याची घटना घडली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक गर्भवती महिलेला दाखल करण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी कोणताही डॉक्टर अथवा वैद्यकीय कर्मचारी हजर नसताना स्वतः गर्भवती महिलेच्या आईनेच आपल्या मुलीची प्रसुती केली होती. या घटनेनंतर आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून या घटनेने संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान त्र्यंबकेश्वर मधील एल्गार संघटनेच्या वतीने आज रास्ता रोको करून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे. या प्रकरणी संबंधित आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे.


एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनी रास्ता रोको आंदोलन (Protest) करण्यात आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक समस्यांच्या संदर्भात वेळोवेळी निवेदने देऊनही अद्याप कामे झाली नाहीत. शिवाय दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अद्यापही आदिवासी बांधव अनेक पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. शासन अनेकदा योजनांचा ढीग उभा करून देत असते. मात्र या योजना आदिवासी पाडा वस्तीवर पोहचलेल्या नाहीत, खऱ्या लाभार्थीपर्यंत पोहचत नाहीत. त्याचबरोबर अनेकदा निवेदने देऊन देखील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. त्यासाठी अनेकवेळा निवेदन देऊनही समस्या सुटलेल्या नाहीत.  


एल्गार संघटनेच्या वतीने अनेकदा मेंटघर किल्ला रस्त्याच्या कामासंदर्भात, बरड्याची वाडी, येल्याची मेट येथील जिल्हा परिषद शाळांना शिक्षक मिळावा, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शबरी घरकुल योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी असे विविध प्रस्ताव अद्यापपर्यंत दिलेले आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली नसल्याने रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचे आंदोलकांनी सांगितले. 


या मागण्यासाठी आंदोलन...  


अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांना निलंबित करावे, व त्या ठिकाणी तात्काळ नवीन वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी. 
शबरी घरकुल योजनेचा लाभ देताना प्राधान्य कातकरी कुटुंबाला द्यावे. मेंटघर किल्ला येथे मंजूर असलेल्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे. टाकेदेवगाव जाणार रस्त्याचे बंद असलेले  काम  तात्काळ सुरू करावे. टाकेदेवगावपैकी गणेशनगर येथे तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि वीज पुरवठा करण्यात यावा. मुख्यालयात न रहाता मुख्यालयी राहतो असे खोटे दस्तऐवज देऊन बिले काढणाऱ्या तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व कातकरी वस्तीवर जल जीवन पाणी पुरवठा योजना देण्यात यावी. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कातकरी वस्तीचा सर्व्ह करून त्या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.