Nashik Trimbakeshwer Mandir : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील महत्वाचे तीर्थस्थळ असलेल्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी फुलले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर महाशिवरात्री (Mahashivratri) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर आज महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध आहे. या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिराचा नेमका इतिहास जाणून  घेणं गरजेचे आहे.  


नाशिक जिल्हा हा धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक नागरी म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिरे पाहायला मिळतात. त्यातलेच एक म्हणजे त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग होय. त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग (Trimbakeshwer Jyotirlinga) मंदिरात तीन नेत्र असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचं (Trimbakeshwer) स्थान अतिशय पवित्र मानलं जात आहे. देशात बारा तर महाराष्ट्रात सहा महादेव मंदिरे असून या ठिकाणास ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. त्यापैकी एक म्हणजेच नाशिकचं त्र्यंबकेश्वर. आज महाशिवरात्री निमित्त मोठ्या संख्येने भाविक भक्त त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आलेले आहेत. विशेष म्हणजे बाराही महिने या मंदिरात भाविकांची गर्दी असते. 


नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. याच शहरातील ब्रह्मगिरी पर्वतातून गोदावरी नदीचा उगम झाला आहे. त्र्यंबकेश्वर शहरातून गोदावरी नदी वाहते. याच गोदेच्या उगमस्थानाजवळ त्र्यंबकराजाचे मंदिर वसलेले आहे. एका आख्यायिकेनुसार ब्रह्मगिरी पर्वतावर असलेल्या गौतम ऋषी आणि गंगा गोदावरी यांच्या प्रार्थनेतून महादेवाने त्र्यंबकेश्वरी वास करण्याचे ठरवले. हे मंदिर गोदावरीच्या नदीच्या अगदी काठावर आहे. या मंदिरास अनेक वर्षांचा इतिहास असून मंदिराच्या गाभाऱ्यात बारा जोतिर्लिंगापैकी वेगळ्या धाटणीचे जोतिर्लिंग पाहायला मिळते. या मंदिराच्या आत पिंडीत ब्रह्म विष्णू महेश अशी तीन छोटी लिंगे आहेत. असे म्हणतात की ब्रह्माने या ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या करुन महादेवास प्रसन्न केले. त्र्यंबकेश्वर शहराला अभेद्य अशा ब्रह्मगिरी पर्वताचा आधार आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी जवळपास सातशे पायऱ्या चढून जावं लागतात. या रुंद पायऱ्या चढून गेल्यावर सपाट भागावर 'रामकुंड' आणि 'लक्ष्मणकुंड' असून शिखरावर गेल्यावर गोमुखातून गोदावरीचे उगमस्थान पाहायला मिळते. 


त्र्यंबकेश्वराचा इतिहास काय सांगतो?


त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा इतिहास अतिशय रंजक असून असे म्हटले जाते की या परिसरात ऋषींचा आश्रम होता, याच आश्रमात गौतम ऋषीही वास्तव्यास होते. मात्र यातील अनेक ऋषी गौतम ऋषींचा हेवा करत होते. एकदा इतर ऋषींनी गौतम ऋषींवर गोहत्येचा आरोप केला. सर्व ऋषींनी एकत्र येत गौतम ऋषींना गंगा गोदावरी प्रकट करण्याचे प्रायश्चित्त सांगितले. त्यानंतर गौतम ऋषींनी स्वतःला बंदिस्त करुन शिवलिंगाची स्थापना केली. वर्षानुवर्षे त्यांनी महादेवाची पूजा करत तपश्चर्या केल्याने त्र्यंबकराज प्रसन्न होऊन पार्वतींसोबत दर्शन दिले. गौतम ऋषींनी यावेळी गंगा गोदावरीस त्र्यंबकेश्वर येथे उगम होण्यास सांगितले. परंतु गंगेने सांगितले की जर महादेव त्र्यंबकेश्वेरी वास्तव्य करणारा असतील मी याच ठिकाणी राहिल. अशा पद्धतीने भगवान शिव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रुपात येथे राहिले.


पेशव्यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला... 


नानासाहेब पेशवे यांनी इ.स. 1755-1786 या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले. या मंदिराचा जीर्णोद्धार 1755 मध्ये सुरु झाल्यानंतर 31 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर 1786 मध्ये पूर्ण झाला. या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे 16 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते, जे त्यावेळी खूप मोठी रक्कम मानली जात होती. भारत सरकारने या मंदिराला दिनांक 30 एप्रिल, इ.स. 1941रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची असून कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. 


त्र्यंबकेश्वर मंदिराची रचना...


त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक प्रश्न इतर अकरा ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे. कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. ज्या त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरु असतो. या स्वरुपाचे हे जगात एकमेव शिवलिंग असल्याचे म्हटलं जातं. आणखी या मंदिराची विशेषता अशी आहे की ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते. ती स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्षापासून सुरु आहे जी बारा ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातच होते.