Nashik News : नाशिक जिल्हा बँकेच्या (Nashik District Bank) ठेवीदारांनी जिल्हा बँकेत जमा असलेल्या ठेवींची रक्कम परत मिळण्यासाठी नाशिकच्या गडकरी चौकातील विभागीय सहनिबंधक यांच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे वस्त्रत्याग धरणे आंदोलन केले आहे. वस्रत्याग आंदोलनामुळे (Protest) पुन्हा एकदा नाशिक जिल्हा बँक चर्चेत आली आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून नाशिक (Nashik) जिल्हा बँक चर्चेत आहेत. कर्जदारांकडून वसुली करण्यासाठी वारंवार तगादा लावला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांसह कर्जदारांनी केला आहे. अशातच आता नाशिक जिल्हा बँकेत 2016 पासून बँकेचे सभासद, वैयक्तिक ठेवीदार, नागरिक तसेच पतसंस्था, पगारदार पतसंस्था तसेच सहकारी बँक यांच्या ठेवी जमा आहेत. मागील सहा वर्षापासून जिल्हा बँकेकडून ठेवींची रक्कम परत मिळत नसताना बँकेचे सभासद आणि ठेवीदार यांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्या माध्यमातून एक दिवसाचे वस्त्रत्याग धरणे आंदोलन केले आहे.


नाशिक जिल्हा बँक ही शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणारी त्याचबरोबर इतर ग्राहकांशी देवाण घेवाण करणारी बँक म्हणून ओळखली जाते. मात्र मागील काही महिन्यापासून कर्जदारांना वाटप केलेल्या कर्जापोटी वसुली करण्यात येत आहे. यात कर्जदारांकडून वसुली न झाल्यास घरातील वाहन किंवा इतर वस्तू जप्त करण्यात येत असल्याचे चित्र आहे. अशातच काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा बँकेविरुद्ध आंदोलन देखील करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. आता या बँकेतील ठेवीदार यांना बँकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 


बँकेकडून पैसे  देण्यास नकार... 


यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले की, नाशिक जिल्हा बँकेत वडिलांनी 2007 साली पैसे गुंतवले होते. मात्र त्यानंतर आर्थिक अडचणीत सापडल्याने पैशांची आवश्यकता होती. दवाखाना असो की कुटुंब असो, उदरनिर्वाह चालवण्यासाठी पैशांची नितांत आवश्यकता आहे. मात्र बँकेकडून सपशेल नकार दिला जात आहे. वरिष्ठांकडूनच बँकेला पैसे येत नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे असल्याचे ठेवीदारांनी सांगितले. 


दोन हजार कोटी रुपये अडकून... 


नांदगाव येथील भीमराव लोखंडे म्हणतात की, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने 2006 पासून ठेवीदारांचे दोन हजार कोटी रुपये अडकून ठेवलेले आहेत.  यामध्ये गरीब शेतकऱ्यांचे पैसे आहेत, काही लोकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे आहेत. पण जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रशासन पुढारी आणि माजी संचालक यांच्या मध्यस्थीने टक्केवारी घेऊन पैसे दिले जातात. परंतु जे गरीब ठेवीदार आहेत, जे असंघटित आहेत, त्यांचे पैसे मिळत नाहीत. म्हणून भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. ते पैसे परत मिळवण्यासाठी आंदोलन करत असल्याचे लोखंडे म्हणाले.