Nashik Trimbakeshwer : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार समोर आला. आरोग्य प्रशासनानला धारेवर धरत एबीपी माझाने (ABP Majha) प्रकरणाचा पाठपुरावा केला. अखेर या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांनतर या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (District Health Officer) सांगितले आहे. 


राज्य सरकार आरोग्य व्यवस्थेबाबत उदासीन असल्याचे वारंवार होणाऱ्या घटनांमधून अधोरेखित होत आहे. अशातच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी (Anjneri) येथे आरोग्य केंद्रात लाजिरवाणी गोष्ट घडली. ती म्हणजे रविवार असल्याने आरोग्य केंद्रात कुणीच कर्मचारी नव्हते. अशावेळी एक महिला प्रसूतीसाठी येते, मात्र डॉक्टर येण्याआधीच्या तिच्या आई व सोबत असलेल्या आशा सेविकेने तिची प्रसूती केल्याचे समोर आले. या घटनेने आरोग्य विभागाचे वाभाडे उडाले. या घटनेनंतर आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार यामुळे राज्यभर चांगलाच चर्चेत आला होता. 


दरम्यान एबीपी माझाने हे संपूर्ण प्रकरण लावून धरताच नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP) आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली असून अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठवण्यात आला आहे. उपसंचालकांकडून लवकरच तो प्रधान सचिवांकडे देण्यात येईल. दरम्यान ग्रामीण भागात असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून बायोमॅट्रीक हजेरी प्रत्येक रुग्णालयात घेतली जाणार असल्याचं जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी हर्षल नेहते यांनी एबीपी माझाशी बोलतांना सांगितले आहे. 


अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणा ठपका.... 


संबंधित महिला रविवारी सकाळी आपली आई आणि आशा सेविकेसोबत रुग्णालयात प्रसूतीसाठी आली. तेव्हा हे दोघेही अधिकारी गैरहजर होते. यातील एक अधिकारी नीट पिजीच्या परीक्षेला गेले होते. मात्र याबाबत त्यांनी प्रशासनाला कुठलीही कल्पना दिलेली नव्हती. तर दुसरे वैद्यकीय अधिकारी आजारी पडले होते.  आणि त्यांनी देखील सुट्टीची परवानगी घेतली नव्हती. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची त्यांच्यावर जबाबदारी असतांना त्यांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे..


झेडपी सीईओ म्हणाल्या... 


दरम्यान या प्रकरणी सीईओ मित्तल यांनी याबाबत आता कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी आता कडक भूमिका घेण्यात येणार आहेत. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात असे प्रकार घडतील तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निलंबनाचा प्रस्ताव तयार होईल. तसेच त्रिसदस्यीय समिती गठीत करून त्यावर गुन्हेदेखील नोंदविण्यात येतील. आरोग्य यंत्रणेत हलगर्जीपणा टाळण्यासाठी आता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सरप्राइज व्हिजिट तंत्रज्ञानाचा वापर करत बायोमेट्रिक हजेरी, लोकेशनसह फोटो, ग्रुप फोटो यासोबतच ग्रामस्तरावरील आरोग्य समिती सक्षम करण्यात येणार आहे