Nashik Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी (Farmer) आर्थिक संकटात सापडला आहे. दुसरीकडे सरकारने वेळोवेळी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. उद्योगपतींचे लाखो रुपये माफ होतात, मग शेतकऱ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
कांद्याच्या दरावरून (Onion Rate) राजकारण चांगलेच तापले आहे. विधानभवनात देखील विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मात्र कांदा दरात किंवा नाफेडच्या खरेदीत कोणत्याही प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना मिळून आलं नसल्याचे चित्र आहे. आणि त्याचमुळे शेतकरी अद्यापही संतप्त आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकला (Nashik) आलेले छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सटाणा, नाशिक, निफाडसह अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. नाशिक शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मात्र ग्रामीण भागातील अवकाळी पावसाने शती पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. द्राक्ष, गहू, हरभरा, कांदा पिकाचे मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी करावं तरी काय? अशी उद्विग्न प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.
भुजबळ पुढे म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत फक्त सरकार मदत करू शकते. उद्योगपतींचे 10 कोटी रुपये जर सरकार माफ करत असेल, तर या शेतकऱ्यांकडे देखील लक्ष दिले पाहिजे. पहिले प्राधान्य शेतकऱ्यांना दिले पाहिजे. पीक विमावाले काहीही मदत करत नाही. शब्द बदल करून शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण देत नाही. अवकाळीने झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे केले पाहिजे. नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून सरकारकडे पुरविली गेली पाहिजे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आयुष्याची होळी व्हायला आली आहे, यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती भुजबळ यांनी केली आहे.
आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे...
दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी आरोग्य केंद्रात एका महिलेची प्रसुती आईने केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. यावर भुजबळ म्हणाले की, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असून फक्त मुंबईमध्ये सरकारी दवाखाना काढून चालणार नाही. मुंबई मनपा सक्षम आहे, त्या ठिकाणी अनेक सुसज्ज असे दवाखाने आहेत. इकडे पण दवाखाने आहेत, पण डॉक्टर नाही,औषध नाही, यावर उपाययोजना आवश्यक असल्याचे भुजबळ म्हणाले.
ज्यांचा विरोध ते मोर्चे काढतात.
तसेच कांदा खरेदी संदर्भात छगन भुजबळ म्हणले की, नाफेड अजूनही मार्केट मध्ये खरेदीला उतरत नाही. प्रत्येक कांद्याचा ट्रॅक्टर येईल, त्यावर बोली लावा. त्यामुळे त्यावर तेथील व्यापारी आणखी मोठी बोली लावेल. शिवाय इतका टन कांदा नाफेडने खरेदी केल्याची चुकीची माहिती सरकारला पुरविली जाते आहे. औरंगाबाद नामांतरावर संजय शिरसाठ यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, कुठलाही निर्णय सगळ्यांना पटतो असं नाही. ज्यांचा विरोध आहे ते मोर्चे काढतात. संजय शिरसाठ काय बोलतील काय सांगता येत नाही.