Deepak Kesarkar : राधानगरी धरणातून (Radhanagari Dam) यंदा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होऊनही अनेक गावे पाण्याखाली का गेली नाहीत? याबाबत कोल्हापूरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी अजब दावा केला आहे. 'मी शिर्डीत (Shirdi) प्रार्थना केल्याने एक फूट पण पातळी वाढली नाही, निसर्गात पण देव आहे, असं त्यांनी नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलx आहे. दरम्यान केसरकरांच्या याच वक्तव्याची सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळांनी 'इकडे या, देवाचा धावा करा आणि आमची धरणे पूर्ण भरु द्या', असे वक्तव्य केले आहे. 


आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) नाशिक शहरात (Nashik) असुन दोन वेगवगेळ्या ठिकाणी दोन्ही मंत्र्याच्या पत्रकार परिषदा पार पडल्या आहेत. यावेळी सुरुवातीला दीपक केसरकर यांनी राज्यातील पावसाची स्थिती सांगताना कोल्हापूर जिल्ह्यातील पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पूरपरिस्थिती नाही. अंधश्रद्धा म्हणा श्रद्धा म्हणा किंवा काहीही म्हणा, पूरपरिस्थिती असतांना मी योगायोगाने शिर्डीत होतो. कोल्हापूरच्या (Kolhapur) राधानगरी धरणातून पाणी सोडले की पाच फूट लेव्हल वाढते. पण यंदा योगायोगाने मी शिर्डीत होतो. त्यामुळे एक फुटाने पण लेव्हल वाढली नाही ही वस्तुस्थिती आहे, देवाकडे मी प्रार्थना करत असल्याचे केसरकर म्हणाले. 


ते पुढे म्हणाले की, "सबंध महाराष्ट्राचा दौरा करत असताना शिर्डीमार्गे नाशिक जाणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र दुसरीकडे कोल्हापुरात पूरपरिस्थिती येते की काय? अशी शक्यताही वर्तवली जात होती. मात्र योगायोगाने त्याच दिवशी मी शिर्डीला उतरलो. साईबाबांचे दर्शन घेतले. त्याच दिवशी पूरपरिस्थिती कमी झाली. पाऊस उघडला, मग राधानगरी धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले. अजून पाऊस सुरु असता तर अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असती. पाटबंधारेकडे तुम्ही चौकशी केली तर 5 ते 6 फूट पाण्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असती, मात्र निसर्गात पण देव आहे, हे जाणवल्याचे केसरकर म्हणाले. 


देवाचा धावा करा, आमची धरणे पूर्ण भरु द्या : छगन भुजबळ


दरम्यान याच वक्तव्याची पार्श्वभूमी घेत छगन भुजबळ यांनी आपल्या पत्रकार परिषदेत हा मुद्दा छेडला. जसे की दीपक केसरकर म्हणाले, शिर्डीत साईबाबा दर्शनांनंतर कोल्हापुरात पाऊस उघडला, पूरपरिस्थिती निवळली. तसंच आमच्या नाशिकला आणि देवाचा धावा करा, आमची धरणे पूर्ण भरु द्या, त्याबद्दल आनंद आहे' असे वक्तव्य छगन भुजबळांनी केले आहे. एकीकडे नाशिक जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा असून दुसरीकडे शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले की मंदिरात दर्शन केल्यानंतर 'कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून पाणी सोडले की 5 फूट लेव्हल वाढते, मात्र एक फुटाने पण लेव्हल वाढली नाही ही वस्तुस्थिती असल्याचे केसरकर म्हणाले. म्हणूनच भुजबळांनी नाशिकला या आणि देवाच्या धावा करा असे आवाहन केले असणार, अशी चर्चा आहे. 


हेही वाचा : 


Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात पूर लागला उतरणीला; पंचगंगा नदीसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने घट