Nashik Gram panchayat : अवघ्या दोन दिवसांवर ग्रामपंचायत निवडणूक (Grampanchayat) मतदान कार्यक्रम येऊन ठेपला असून प्रचार शिगेला पोहचला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये निवडणुका होणार असून यामध्ये अनेक लोकप्रतिनिधीचा कास लागणार आहे. शिवाय अनेक ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. 


नाशिक जिल्ह्यात 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये निवडणुका (Grampanchayat Election) होणार असून नाशिक जिल्हा - इगतपुरी 2, कळवण 16, चांदवड 35, त्र्यंबकेश्वर 1, दिंडोरी 6, देवळा 13, नांदगाव 15, नाशिक 14, निफाड 20, पेठ 1, बागलाण 41, येवला 7, सिन्नर 12या ग्रामपंचायतीमध्ये रविवार मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात एकुण ग्रामपंचायती 196 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत असून यामध्ये 07 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर 19 बिनविरोध सरपंच निवडून आले आहेत. तसेच 579 सदस्य बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरीत जागांवर मतदान होणार आहे. 


दरम्यान उर्वरित 1291 जागांवर मतदान होणार असून यामध्ये 177 जगा या सरपंच पदासाठी असणार आहेत. यासाठी जिल्ह्यात एकुण 745 मतदान केंद्र  सज्ज झाली आहेत, यावर  सडे चार हजाराहून अधिक कर्मचारी कामकाज बघणार आहेत. तर एकूण सदस्य पदासाठी 2897 तर सरपंच पदासाठी 577 उमेदवार रिंगणात असल्याने याही निवडणुकीत विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. यापैकी जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नांदूर शिंगोटे, दाभाडी, वडाळीभोई , उमराळे, डांगसौंदाणे या ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत तर आमदार छगन भुजबळांच्या मतदारसंघ असलेल्या येवल्यात एक, शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव मतदारसंघात तिन ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका होणार आहेत विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या खासदार असलेल्या दिंडोरी लोकसभेच्या मतदारसंघातील 7 तालुक्यात निवडणुका लागल्याने त्यांची देखिल प्रतिष्ठा पणाला लागलीय.


सहा दिवसांपासून प्रचार सुरु असून आता हा प्रचार शिगेला पोहचला आहे. आता उमेदवार घरोघरी जाऊन प्रचारावर भर देत आहेत.दरम्यान येत्या 18 डिसेंबरला मतदान होईल आणि त्यानंतर मतमोजणी होईल. तत्पूर्वी मतदानाच्या 24 तास आधी अधिकृत प्रचार थांबेल. संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आणण्यासाठी अर्ज माघारीपर्यंत खलबते सुरू होती. सरपंचांच्या बिनविरोध निवडीसाठी उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागली. अर्ज माघारीनंतर आता मतदान यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मनसुबे आखले जात आहेत.