Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात लाचखोरीच्या (Bribe) घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. मागील दोन दिवसात जिल्ह्यात तीन घटना समोर आल्या आहेत. नाशिक (Nashik City) शहरातील महानगरपालिकेतील एका कर्मचाऱ्यास 24 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
दरम्यान चांदवड (Chandwad) तालुक्यातील कोषागार कार्यालयातील अधिकाऱ्याची लाच स्वीकारतानाची घटना ताजी असतानाच आज नाशिक शहरात महानगरपालिकेतील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. नाशिक महानगर पालिकेतील (Nashik Mahanagar Palika सार्वजनिक बांधकाम विभागात तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या भाऊराव काळू बच्छाव या कर्मचाऱ्याने लाच स्वीकारली आहे. त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. मात्र आता पुन्हा नाशिक शहरासह जिल्ह्यात लाच घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
नाशिक शहरातील राणे नगर परिसरात राहणाऱ्या भाऊराव बच्छाव हे महानगरपालिकेत सार्वजनिक बांधकाम विभागात तांत्रिक सहाय्यक म्हणून पदावर कार्यरत आहेत. यातील तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांना त्यांचे कामादरम्यान महापालिकेच्या डांबरी रस्त्यापलीकडे केबल टाकण्याकरीता संशयित लोकसेवक यांनी तक्रारदार यांना रस्ता खोदण्याची परवानगी देण्याचे मोबदल्यात 25 हजार केली. मात्र तडजोडी अंती 24 हजार रुपये देण्याचे ठरले. मागणी केलेली लाचेची रक्कम संशयित लोकसेवक यांनी पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सदर मागणी केलेली 24 हजार रुपयांची लाच भाऊराव बच्छाव याने पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांनी केली असून या पथकात पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, असई सुखदेव मुरकुटे, पोना मनोज पाटील यांचा पथकात समावेश होता.
संपर्क साधण्याचे आवाहन
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात पोलीस कर्मचारी, अधिकारी वर्गांमध्ये लाच घेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षभरात लाच लुचपत विभागाने अनेक पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीकडून कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.