Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या (Health Department) वतीनं आजपासून गोवर प्रतिबंधक (Rubela) विशेष लसीकरण मोहिमेला (Vaccination) सुरूवात झाली असून 15 ते 25 डिसेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येत आहे. नाशिक शहरात महापालिका वैद्यकीय आणि बालसंगोपन विभागाच्या वतीनं थेट शहरातील झोपडपट्टयांमध्ये (Slum Area) जाऊन ज्या बालकांना आजपर्यंत लस काय असते हेच माहीत नव्हते, अशा बालकांना गोवर लस देण्यात येत आहे. 


नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP) आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात आज पासून गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर शहर व जिल्हा सर्व आरोग्य संस्थांच्या वतीने 15 ते 20 डिसेंबर या कालावधीत गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहरते यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्र व 592 आरोग्य उपकेंद्र स्तरावरून ही मोहीम राबविण्यात येत आहे. 


सुरुवातीला या बालकांना लस देणं तसं वैद्यकीय पथकाला कठीण जात होतं, पथकाने या मुलांच्या पालकांना गोवर हा आजार नक्की काय आहे? लसीकरणाचे महत्व काय? हे पटवून देताच पालक बालकांना लस देण्यास तयार झाल्याचं बघायला मिळाल. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी शहरातील बारा आरोग्य केंद्रावर ही गोवर प्रतिबंधक लस दिली जात असून लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर चार आठवडयांनी दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. बालकांना लस टोचून घेऊन जिल्हा गोवरमुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं नागरिकांना करण्यात येत आहे. दरम्यान शहरातील औरंगाबाद नाका परिसरातील झोपडपट्टीतून या लसीकरण मोहिमेची सुरवात करण्यात आली आहे. 


दरम्यान डिसेंबर महिन्यात गोवर प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस 15 ते 25 जानेवारी या कालावधी दिला जाणार आहे. दहा दिवसांच्या कालावधी दरम्यान दुसरा डोस देण्यात येणार आहे. या संदर्भात नियोजन आखण्यासाठी शहर जिल्ह्यातील 9 ते 12 आणि 16 ते 24 वयोगटातील मुला मुलींची माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार ग्रामीण भागातील पहिला डोस 2778 व दुसरा डोस 2684 लाभार्थ्यांना दिला जात आहे यासाठी जिल्ह्यात 518 लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान सर्व नागरिकांनी आपल्या घरातील आपल्या परिसरातील नियमित लसीकरणांपासून वंचित राहिलेला लाभार्थ्यांनी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून गोवरच्या प्रतिबंधात्मक लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना गोवरची लस टोचून घ्यावी व जिल्ह्यातील लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागात सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.