Nashik Shubhangi Patil : गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्ते झटत होते, रात्रीचा दिवस करून कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. निवडणुकीच्या काळात मतदारांचे प्रचंड प्रेम मिळाले. एवढं प्रेम कुण्या मंत्र्यांच्या पोरीलासुद्धा मिळाले नाही. आता निवडणूक निकालानंतर आता मुंबईत जाऊन विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे मत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी  व्यक्त केलं आहे. 


एकीकडे नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निकालाच्या पार्श्वभूमीवर आज शुभांगी पाटील यांनी त्र्यंबकेश्वराचे (Trimbakeshwer) दर्शन घेतले. तत्पूर्वी त्यांनी माझाशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. शुभांगी पाटील यावेळी म्हणाल्या की, निवडणुकीचा प्रचार हा जनतेने केला असून जनता या निवडणुकीत विजयी होणार आहे. विजय हा आपला होणार आहे, म्हणजे जनतेचा होणार आहे. जो पदवीधर मतदार महिला, पुरुष होते शिक्षक होते. पदवीधर, विद्यार्थी, अनेक डॉक्टर इंजिनिअर्स वकील सगळे होते. तो सगळा कौल हा आपल्या बाजूने आहे. तुम्ही जर पदवीधरांमध्ये कौल घेतला असता तर नक्कीच पदवीधर जो होता म्हणजे, माझं बूथ लागलं आहे की, नाही. याकडे कोणाचाच लक्ष नव्हतं. फक्त 14 नंबरकडे लक्ष होतं. हा जनतेने हातात घेतलेली निवडणूक होती. 


पाटील पुढे म्हणाल्या, नाशिक पदवीधर मतदारसंघातील जनतेने मेहनत घेतली असून विजय निश्चित आहे. कोणी काहीही म्हटलं तरीही विजय निश्चित आहे. कारण की, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मतदान किती झालेला आहे. कुठे काहीही चुकी जर झाली तर आम्ही कधीच हे करणार नाही. कारण की, मतदान किती झालेलं आहे, याचा पूर्ण एक एक मतदानाचा अहवाल आहे. निवडणूक सुरू असताना अनेक लोक भेटले. काका, आजोबा, मावशी, आत्या अनेकांनी आम्हाला मदत केली. नाशिक जिल्ह्यात फिरत असताना पिंपळनेर सटाणा, कळवण, बागलाण तालुक्यात फिरले. रस्त्या रस्त्याने लोक मला धरून रडत होती की, नाही तुला चालायचं आहे, तुला जिंकायचं आहे. म्हणजे इतकं प्रेम मिळत आहे. एवढं प्रेम मंत्र्याच्या पोरीलासुद्धा भेटणार नाही. इतकं प्रेम तुमच्या जनतेने दिलं. म्हणजे कधीही अपेक्षित नव्हतं एवढं प्रेम सगळ्या जनतेने दिलं. जनता म्हणजे, मतदार जे जे झालेले आहेत. दहा ते पंधरा हजार फोन येऊन गेले असून यावरून कौल घेऊ शकता की, कोण विजयी होणार, असंही त्या म्हणाल्यात.  


मुंबईत करणार आंदोलन... 


दरम्यान, शुभांगी पाटील निवडणूक निकालानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर त्या मुंबईमध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. यात प्रामुख्याने प्रचलित अनुदान, पेन्शनचा प्रश्न, प्रस्तावित वाढीव पद, पदभरती, सुशिक्षित बेरोजगारी, संस्थाचालकांना वेतनेतर अनुदान, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाला बसणार... जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उठणार नसल्याचा पवित्रा शुभांगी पाटील यांनी घेतला आहे.