Nashik Kalika Devi : नाशिकचे (Nashik) ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या कालिका माता (Kalika Devi) मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव उत्सवाला (Navratri 2022) प्रारंभ झाला असून मोठया संख्येने भाविकांनी गर्दी केली असून यंदा कालिका मातेला शंभर तोळ्याचे दागिने परिधान करण्यात आले असून दीडशे किलोच्या चांदीचा महिरप उभारण्यात आला आहे. तसेच कालिका मातेच्या शंभर किलोच्या दागिन्यांसाठी एक कोटींचा इन्शुरन्स काढण्यात आला आहे. 


नाशिकच्या जुन्या आग्रारोड नजीक असलेले कालिका मातेचे मंदिर म्हणजे नाशिकच्या वैभवात भर घालणारे हे मंदिर नाशिककरांचे विशेष आकर्षण आहे. दोन वर्षांच्या व्यत्ययानंतर यंदा मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्रीचा उत्साह भाविकांमध्ये संचारला आहे. आजपासून नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका माता देवी मंदिराच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला असून आज सकाळपासूनच देवी दर्शनाला भाविकांना गर्दी केली आहे. तर मंदिर प्रशासनाने नवरात्रीची जय्यत तयारी केली असून आज आज पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची रीघ लागल्याचे पाहायला मिळत आहे. 


दरम्यान देवीला यंदा शंभर तोळ्याचे दागिने करण्यात आले असून हे दागिने देवीला परिधान करण्यात आले आहेत. शिवाय देवी मंदिराचा महिरप साधारण दीडशे किलो चांदीच्या स्वरूपात उभारण्यात आले आहेत. याशिवाय या दागिन्यांचा एक कोटींचा इन्शुरन्स देखील मंदिर प्रशासन समितीने काढला आहे. त्याचबरोबर भाविकांचा देखील दोन कोटींचा विमा काढण्यात आला आहे. हे दागिने इतर वेळी लॉकर मध्ये ठेऊन सुरक्षितता जपली जाते. दरम्यान शंभर तोळ्यांच्या दागिन्यांनी कालिका देवीचे मनमोहकी रूप भाविकांना बघायला मिळत आहे. तर नाशिक येथील जाधव या भाविकाने देवीला 51 हजारांचे हार, तर उत्तमराव महाले यांनी सव्वा किलो चांदी देवीच्या पादुकांसाठी अर्पण केली आहे. 


एक ते दीड लाख भाविक येण्याची शक्यता 
दरम्यान आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरवात झाली असून पहाटेपासून भाविकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. आज पहाटे तीन वाजता काकड आरती तसेच पहाटे पाच वाजता विश्वस्त घटस्थापना तसेच सकाळी मान्यवरांच्या हस्ते सात वाजता महापूजा तसेच नाशिक मधील राजकीय सामाजिक अध्यात्मिक मान्यवरांच्या हस्ते महापूजा व आरती तसेच दुपारी बारा वाजता श्रींची नैवेद्य व आरती दुपारी एक ते पाच महिला मंडळांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. संध्याकाळी सात वाजता मंगल वाद्याच्या गरज व रात्री बारा वाजता महाआरती केली जाणार आहे. साधारण दररोज कालिका मातेच्या दर्शनाला एक ते दीड लाख भाविक येण्याची शक्यता मंदिर प्रशासनाने व्यक्त केली आहे.