APMC Election 2023 : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने (State Cooperative Election Authority) काढलेल्या आदेशात पुन्हा एकदा बदल करत नवा आदेश निर्गमित केला आहे. बाजार समिती निवडणूक मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी 26 एप्रिलला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी दोन संस्थांचे सदस्य असलेल्या नागरिकास एकदाच मतदान करण्याचा अधिकार बहाल करणारी अधिसूचना निर्गमित केली. त्यानंतर राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यानंतर नवा आदेश काढण्यात आला आहे. 


ग्रामीण भागातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेली बाजार समिती निवडणूक (Bajar Samiti Election) आज पार पडत आहे. आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी दोन संस्थांचे सदस्य असलेल्या नागरिकास एकच मतदान करण्याचा अधिकार बहाल करणारी अधिसूचना निर्गमित केली. त्यावरुन राज्यभरातून तीव्र विरोध करण्यात आला. शिवाय या आदेशाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिल्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिवांनी सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी सुधारित अधिसूचना काढून पुन्हा दोन संस्थांच्या सदस्यांना दोन वेळा मतदान करण्याचे अधिकार बहाल केले आहेत. या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी ठेवण्यात आली असून आता याचिकेवरील सुनावणीची औपचारिकताच राहिली आहे. 


दरम्यान राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दोन दिवसांपूर्वी काढलेल्या आदेशामुळे (Nashik APMC Election) खळबळ उडाली होती. सदर आदेशानुसार एका मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघांच्या अंतिम मतदार यादीत समाविष्ट असल्यास त्या मतदाराला एकापेक्षा अधिक मतदार संघात मतदान करता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे बाजार समिती निवडणुकांमधील दिग्गजांच्या नियोजनावर पाणी फेरले होते. राज्यभरातून या आदेशाला विरोध करण्यात येत होता. शिवाय औरंगाबाद खंडपीठात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी नव्याने आदेश निर्गमित केले आहेत. 


काय म्हटलंय नव्या आदेशात? 


पहिला आदेश रद्द करत असून आता एका मतदाराचे नाव एकाच मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीत एकापेक्षा जास्त वेळेस समाविष्ट झाल्यास संबंधित मतदारास त्या त्या मतदारसंघात निवडून द्यावयाच्या सदस्य संख्येइतके मतदान करता येणार असल्यामुळे संबंधित मतदारास एकाच वेळी मतदान करता येईल. एका मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघाचे अंतिम मतदार यादीत समाविष्ट असल्यास त्या मतदारास त्या त्या मतदारसंघात सदर मतदारसंघाच्या वतीने निवडल्या जाणाऱ्या सदस्यांच्या संख्येइतके मतदान करता येईल.


एकाच मतदाराचा एकापेक्षा अधिक मतदारसंघाकरता तयार करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत समावेश झालेला असल्यास अशा मतदाराने एकापेक्षा अधिक मतदारसंघात मतदान करणे अपेक्षित असल्यामुळे बाजार समितीच्या प्रत्येक मतदारसंघाच्या मतदानाकरता महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणूक) नियम 2017 चे नियम 45 (3) मधील निर्देशानुसार, अनुक्रमे डाव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताची तर्जनी, डाव्या हाताची मध्यमा, डाव्या हाताची अनामिका व डाव्या हाताची करंगळी वर पक्क्या शाईची खूण करण्यात यावी. डाव्या हाताची सर्व बोटे नसतील तर त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यास किंवा वरीलप्रमाणे अनुक्रमे इतर बोटास आणि दोन्ही हातांची सर्व बोटे नसतील तर त्याला असलेल्या डाव्या किंवा उजव्या हाताच्या टोकास पक्क्या शाईची खूण करण्यात यावी. एखाद्या व्यक्तीचे नाव एकापेक्षा जास्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्यास सदर व्यक्तीस संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीमध्ये मतदान करता येईल. 


इथे पहा नवा आदेश