Nashik APMC Election : संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Bajar Samiti Election) संचालक मंडळासाठी पोलीस कडेकोट बंदोबस्तात निवडणूक मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर जिल्ह्यातील फक्त सुरगाणा बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे उर्वरित 13 पैकी 12 बाजार समित्यांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. 


गेल्या महिनाभरापासून नाशिक (Nashik) बाजार समितीसह जिल्ह्यातील 13 बाजार समित्यांची (Bajar Samiti) निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे. यातील सुरगाणा वगळता आज बारा आणि मनमाड बाजार समितीसाठी (Manmad Bajar Samiti) 30 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. इतर तालुक्यांत बाजार समिती निवडणूक (Bajar Samiti Election) मतदानाला सुरवात झाली आहे. या निवडणुकीत जवळपास तीस हजाराहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यासाठी जिल्हाभरात शंभर मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 13 बाजार समित्यांच्या 223 जागांसाठी 537 उमेदवार रिंगणात आहे. 29 जागांवरील निवडणूक (Election) ही बिनविरोध पार पडली आहे.


नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव (Lasalgaon) या मोठ्या बाजार समित्यांबरोबरच घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव, मनमाड आणि सुरगाणा अशा 14 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये सुरगाणा बाजार समितीच्या सर्वच्या सर्व 18 संचालक पदांची निवडणूक ही बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित 13 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 223 जागांकरिता 537 उमेदवारांचे भवितव्य आज मतदार ठरवणार आहे. सुरगाणा बाजार समितीसाठी असलेल्या 18 जागा तसेच देवळा बाजार समितीच्या आठ तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन अशा एकूण 29 जागा बिनविरोध झाल्या आहेत.


तीस हजारांहून अधिक मतदार 


दरम्यान आज होत असलेल्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील तेरा बाजार समितीकरिता सहकारी संस्था गटातून 11 हजार 319 मतदार असून ग्रामपंचायत सदस्य 10 हजार आठशे, व्यापारी 5587आणि हमाल व मापारी 2582 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज होत असलेल्या मतदानानंतर मतमोजणीची प्रक्रिया शनिवार दि. 29 एप्रिल रोजी पार पडणार आहे. तर मनमाड बाजार समितीसाठी 30 एप्रिलला मतदान होऊन 1 मे रोजी मतमोजणी होणार आहे. तर 13 बाजार समित्यांच्या 223 जागांसाठी 537 उमेदवार रिंगणात आहे. महत्वाचे म्हणजे नाशिक बाजार समितीमध्ये माजी खासदार देवीदास पिंगळे आणि चुंभळे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. नाशिक, पिंपळगाव बसवंत, मनमाड, लासलगाव आणि येवला या पाच बाजार समित्यांचे निकाल जिल्ह्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.


अशी आहेत मतदान केंद्रे 


नाशिक जिल्ह्यात नाशिकसह सुमारे 100 मतदान केंद्रांमध्ये आज मतदान होणार आहे. यात नाशिक तालुक्यात 13 मतदान केंद्रे आहेत. पिंपळगाव बसवंत येथे 10 केंद्रे, घोटीमध्ये 12, देवळ्यात 3, कळवणमध्ये 6, दिंडोरीमध्ये 7, चांदवडमध्ये 8, येवल्यात 7, नांदगावमध्ये 6, सिन्नरमध्ये 16, मालेगावमध्ये 12, लासलगावमध्ये 7, तर मनमाडमध्ये 4 मतदान केंद्रे आहेत. सुरगाणा बाजार समिती निवडणूक अगोदरच बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित 13 समित्यांपैकी मनमाडचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांत आज मतदान प्रकियेला सुरुवात झाली आहे. यातील नाशिक, पिंपळगाव, चांदवड, येवला, मालेगाव आणि लासलगाव येथे शनिवारी निकाल लागेल. तर घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, सिन्नर येथे शुक्रवारी लगेचच मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.