Nashik Sharad Pawar : एकीकडे राज्यात भाजपविरोधात (BJP) विरोधक एकजूट करण्याची चर्चा करत असताना दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजप आघाडीला (NDPP BJP) सत्तेसाठी पाठिंबा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र शरद पवार यांनी या प्रश्नावर सखोलपणे उत्तर देत नागालँडमध्ये सरकारला पाठिंबा का दिला? याबाबत सविस्तरपणे भूमिका मांडली. 


शरद पवार (Sharad Pawar) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. नुकतंच झालेल्या नागालँडच्या निवडणुकीत एनडीपीपी आणि भाजपला ( NDPP And BJP) मतदारांनी कौल दिला असल्याने एनडीपीपी आणि भाजपने सरकार स्थापन केले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केल्याने विरोधकच नसल्याचे पहिल्यांदाच घडले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने येथील भाजप पक्षाला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी पक्षाने भाजपला पाठिंबा का दिला? नागालँडमध्ये युती झाली का? असे प्रश्नही उपस्थित झाले. मात्र यावर शरद पवार यांनी नाशिकमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, भाजपला पाठिंबा दिलेला नाही. नागालँडमध्ये कुठलाच पक्ष बाहेर राहिलेला नाही. सगळे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे.


शरद पवार यांनी नागालँड सरकार बनवताना आमचा भाजपाला पाठिंबा नाही, तर आमचा पाठिंबा हा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना आहे आणि ते भाजप पक्षाचे मुख्यमंत्री नाहीत तर नागालँड येथील स्थानिक पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. एक काळ असा होता की या ठिकाणी नागा संघटना देश विघातक कार्यक्रमात सहभागी होत्या. या सर्वांना एकत्र आणावं आणि या गोष्टी टाळाव्यात यासाठी प्रयत्न येथील मुख्यमंत्र्यांनी केला होता. ते मुख्यमंत्री भाजपचे नाहीत. आमचे जे काही सात उमेदवार निवडून आलेत, ते देखील म्हणाले आहेत की 'आम्ही भाजपबरोबर जाणार नाहीत', मात्र मुख्यमंत्र्यांकडून ऐक्याच्या दृष्टीने काही पावलं टाकली जात असतील तर आम्ही त्यास नकारात्मक दृष्टीने बघणार नाही' त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सोबत जात आहोत, असेही शरद पवार यांनी सांगितले.


सर्वच पक्षांनी दिला पाठिंबा 


दरम्यान नागालँड निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात उमेदवार निवडून आले. त्याचबरोबर आरपीआय गटाचे देखील दोन उमेदवार निवडून आले. असे असताना या ठिकाणी स्थानिक पक्ष असलेला एनडीपीपी आणि भाजप पक्षाने सरकार स्थापन केले. मात्र यावेळी सर्वच पक्षांनी या सरकारला पाठींबा दिला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील पाठिंबा दिला. याचा कारणच खुद्द शरद पवार यांनी सांगितलेकी, मुख्यमंत्री पदावर असलेले उमेदवार हे स्थानिक पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, शिवाय सर्वच पक्ष एकत्र येऊन हा निर्णय घेत असल्याने आमच्या उमेदवारांचा देखल तोच अजेंडा असल्याने सरकारला पाठिंबा दिल्याचे सांगत भाजपाला पाठिंबा दिला नाही, हे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.