Nashik Sinner News : सिन्नरच्या (sinner) चोंढी शिवारात दुचाकीवरून थेट कालव्यात पडून बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह अखेर सापडला आहे. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाला तब्बल वीस तासांच्या तपासानंतर यश आले आहे. दरम्यान पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे काही वेळेपूर्वीच घटनास्थळी पोहचले होते. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर परिसरात राहणारे गणेश गीते (Ganesh Gite) हे कुटुंबासह शिर्डी येथून घरी परतत असताना चोंढी शिवारात गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी गोदावरी उजव्या कालव्यात पडली. यावेळी जवानासह स्थानिक नागरिकांनी त्यांची पत्नी व मुलांना वाचवले. मात्र गणेश गिते हे पाटाच्या पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकासह स्थानिक नागरिकांनी शोध मोहीम सुरु केली होती. मात्र शोध काही लागत नव्हता. आज पालकमंत्री भुसे यांनी देखील घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. मात्र संतप्त गावकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. कॅनॉलचं पाणी रात्रीच का बंद केलं नाही? कॅनॉलचं पाणी रात्रीच बंद केलं असतं, तर आतापर्यंत जवानाचा शोध लागला असता, असं म्हणत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.


दरम्यान आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास जवान गणेश गीते यांचा मृतदेह शोधण्यास बचाव पथकास यश आले आहे. गणेश गीते हे पंतप्रधानांच्या विशेष पथकात तैनात असल्याची माहिती आहे. गणेश गिते हे 24 फेब्रुवारीपासून सुट्टीवर आले होते. गुरुवारी गणेश पत्नी रुपाली, मुलगी कस्तुरी आणि मुलगा अभिराज यांच्यासह शिर्डी येथे दर्शनासाठी बाईकने गेले होते. शिर्डीहून परतत असताना नांदूरमाधमेश्वर धरणातून गेलेल्या उजव्या कालव्याच्या बाजूने चोंढी शिवारात असलेल्या घराकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. मेंढी-ब्राह्मणवाडे रस्त्यावर तवंग परिसरात ही घटना घडली होती. गणेश यांच्या बाईक ताबा सुटल्याने उजव्या कालव्यात पडली. आवाज झाल्याने आजूबाजूला असलेले काहीजण धावत घटनास्थळी पोहोचले. त्यानतंर त्यांनी गणेशची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांना सुखरुप बाहेर काढलं. मात्र पाण्याच्या प्रवाहात गणेश वाहून गेले. या घटनेनंतर कुंटुबियांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.



पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी 


दरम्यान गुरुवारी घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांसह बचाव पथकाने जवान गणेश गीते यांचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र तब्बल वीस तास बचावकार्य सुरु होते. त्यांनतर आज सकाळी पालकमंत्री दादा भुसे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नाफेडची बैठक स्थगित करून सिन्नर गाठले. आपण मागच्या सरकारमध्ये सैनिक कल्याण विभाग सांभाळला आहे. सैनिकांप्रती असणाऱ्या आदरभावामुळेच सर्व बैठका रद्द करून परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः आलो, जोपर्यंत बेपत्ता जवान सापडत नाही तोपर्यंत आपण स्वतः इथेच थांबणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.


 


काय घटना घडली होती? 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एसपीजी कमांडो गणेश सुखदेव गीते हे सिन्नर तालुक्यातील चोंढी या आपल्या गावी सुट्टीनिमित्ताने आले असता कालव्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी आपली पत्नी, लहान मुलगा आणि मुलीसह ते शिर्डीला साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते आणि सायंकाळी घरी परतत असताना नांदूरमधमेश्वर उजवा या कालव्यावरून घराकडे वळत असताना मोटरसायकलच्या पुढे टाकीवर बसलेल्या लहान मुलीचा पाय हँडल मध्ये अडकल्याने गाडीचा तोल जाऊन हे सर्वजण नाल्याच्या पाण्यात पडले. गणेश यांनी बायको, मुलगा आणि मुलीला पाण्यातून बाहेर काढले. मात्र ते स्वतः पाण्यात वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह सापडण्यात प्रशासनाला यश आले नव्हते अखेर आज सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले असता काही वेळापूर्वी मृतदेह मिळाला आहे. कॅनॉलचे पाणी थांबवले असते तर मृतदेह लवकर मिळाला असता असा गावकऱ्यांचा आरोप आहे.