Chandavad Renuka Devi : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवड (Chandvad) गावी गडावर वसलेल्या रेणुका मातेची (Renuka Devi) महती राज्यभरात पसरलेली आहे. यंदा निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव (Navratri) साजरा होत असल्याने चांदवडच्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक गडावर दाखल होत आहेत. नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळ रेणुका मातेचे प्राचीन जागृत व प्रसिद्ध देवस्थान असून सप्तशृंगीनंतर नाशिक जिल्ह्यात रेणुका देवी भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. 


चांदवड शहराजवळ घाटमाथ्याला रेणुका देवीचे मंदिर दृष्टीस पडते. बाहेरून मंदिर सुसज्ज असले तरी रेणुका माता ही स्वयंभू असल्याने गाभारा गुहेतच पाहायला मिळतो. हे मंदिर म्हणजे चांदवड शहराला जणू कोंदण लाभले आहे. कोरोनाच्या निर्बंधमुक्तीनंतर मंदिराला भाविकांच्या रूपाने झळाळी मिळाली आहे. यंदा रेणुकामातेच्या नवरात्रोत्सवाने परिसरात उत्साहाचे वातावरण असून राज्यातील व परराज्यांतील हजारो भाविकांच्या गर्दीने चांदवड आणि रेणुकामातेचा मंदिर परिसर फुलून गेला आहे. 


पूर्वी चांदवड शहरात अहिल्याबाई होळकर यांच्याकडून रेणुका देवीच्या पूजा विधीचे सोपस्कार पार पाडले जात असत. त्यानंतर अनेक वर्ष होळकर घराणे हे काम पाहत होते. मात्र सद्यस्थितीत रेणुका देवीचे ट्रस्ट च्यामाध्यमातून कामकाज चालते. नवरात्रोत्सवाच्या काळात देवीला आभूषणांनी सजविले जाते. देवीचा मुखवटा सोन्याचा असून, तो जवळजवळ दोन किलो वजनाचा आहे. नवरात्रीत प्रत्येक दिवशी सकाळी एक पालखी रंगमहालातून निघते. तिच्यात देवीचा मुखवटा व दागदागिने असतात. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ही पालखी डोंगरातील देवीच्या मंदिरात जाते. दिवसभर देवीचा सोन्याचा मुखवटा व दागदागिने मंदिरात देवीच्या अंगावर असतात. रात्री आठ वाजता ही पालखी पुन्हा पोलिस बंदोबस्तात रंगमहालात परत आणण्यात येते. 


गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिराची देखभाल करण्याचे काम ट्रस्टचे व्यवस्थापक व विश्वस्त मंडळ करीत आहे. या परिसरात भक्तनिवास विश्रामगृह स्त्रियांसाठी प्रसाधनगृह तसेच दर्शन बारीसाठी स्टीलचे बॅरिकेडिंग, वाहनतळ संपूर्ण मंदिर परिसरात सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आल्याने संपूर्ण मंदिर परिसराला झळाळी मिळाली आहे. या देवस्थानाला माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या प्रयत्नामुळे 'ब' वर्गाचा दर्जा देखील देण्यात आला आहे. 


अशी आहे आख्यायिका 
रेणुका ही माहूरगडावर आश्रम असलेल्या जमदग्नी नावाच्या अतिशय कोपिष्ट ऋषींची पत्नी. परशुराम हा जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र. रेणुका रोज पतीचे पाय धुण्यासाठी नदीवरून पाणी आणायची. एकदा ती नेहमीप्रमाणे नदीवर पाणी आणायला गेली असता घरी येण्यास उशीर झाला. रेणुकेच्या उशिरा येण्याचे कारण लक्षात येताच त्या कोपिष्ट ऋषींच्या रागाचा पारा चढला. रागाच्या भरातच रेणुकेचे मस्तक धडावेगळे करण्याची आज्ञा त्यांनी परशुरामाला दिली. वडिलांच्या तोंडून शब्द निघताच त्याने परशु सरसावला आणि एका घावातच आपल्या मातेचे मस्तक धडावेगळे केले. रेणुकेचे मस्तक तिथून जे उडाले ते चांदवडला सध्या जिथे देवीचे मंदिर आहे तिथे येऊन पडले आणि धड माहूर येथेच राहिले. तेव्हापासून माहूर आणि चांदवड येथे रेणुकेची स्थापना झाली. 


नवरात्रीत देवीची मोठी यात्रा
नवरात्रातील नऊ दिवस चांदवड गडावर मातेच्या मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. सप्तशृंगगडानंतरची मोठी यात्रा म्हणून येथील यात्रेचा उल्लेख करावा लागेल. यात्रेच्या काळात नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर दूरदूरच्या ठिकाणांहून भाविक देवीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने येतात. नवरात्रात नऊ दिवस येथे घटस्थापना केली जाते. यात्रेत प्रचंड गर्दी असते, मिठाईची दुकाने खेळणी वगैरे दुकाने असून सुद्धा यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे रहाट पाळणे वगैरे इत्यादी असतात.