Nashik Murder Case : नाशिकचे (Nashik) उद्योजक सोनवणे यांच्या हत्येचा उलगडा झाला असून सोनवणे यांचे अपहरण करुन खून करणाऱ्या तिघा संशयितांना पोलिसांनी 9Nashik Police) शिताफीने अटक केली आहे. गेल्या वीस दिवसांपासून या घटनेचा संपुर्ण पोलीस यंत्रणा तपास करत असलेल्या आव्हानात्मक खूनाचा उलगडा झाला असून तिघांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 


नाशिकमधील बहुचर्चित उद्योजक शिरीष सोनवणे (Sonawane Murder Case) हत्या प्रकरणाचे गूढ उकलले असून या संदर्भात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साधारण महिनाभरापूर्वी नाशिकच्या एकलहरे परिसरातील फर्निचर व्यावसायिक शिरीष सोनवणे यांच्या खुनाच्या घटना घडली होती. त्या प्रकरणातील संशयित पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. प्रवीण पाटील, रामचंद्र कोंढाळकर व अजून एका संशयिताला नाशिकरोड पोलिसांनी (Nashikroad Police) बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलिसांकडून त्यांच्या रिमांडची मागणी करण्यात येणार आहे. 


नाशिक शहरातील येथील एकलहरे रोड येथील फर्निचर व्यावसायिक व शाळेचे बेंच बनवणाऱ्या कारखान्याच्या संचालक शिरीष सोनवणे यांचा 9 सप्टेंबर म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दिवशी कारखान्यातून अपहरणाची घटना घडली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह मालेगाव तालुक्यातील सातरपाडे शिवातील कालव्यात मिळून आला होता. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांकडे या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्याचबरोबर नाशिक पोलिसांसह विविध पथकांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून सदर गुन्ह्यांचा तपास सुरू होता. शहर व तसेच ग्रामीण पोलीस या पुण्यातील संशयितांना पकडण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर प्रयत्न करत असताना सोनवणे यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागल्याची माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे दिली आहे.


अपहरणाचा बनाव 
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयताच्या मोबाईल मधून सिमकार्ड काढून दुसरा मोबाईल घेतला होता. पहिला संशयित सापडला, त्याच्याकडून दुसऱ्या संशयितांची माहिती मिळाली. त्यास चाळीसगाव येथून अटक करण्यात आल्यानंतर तिसऱ्या संशयिताचा शोध लागला. सद्यस्थितीत या तिघांची पोलीस कोठडीत घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पकडलेल्या संशयितांपैकी प्रवीण काळे याचे अंबड परिसरात फेब्रिकेशन वर्कशाॅप आहे. अपहरणासाठी वापरलेली कार मुंबईला गणपती पाहण्यासाठी जायचे असल्याचे कारण सांगत मेव्हण्याकडून आणली होती. प्रवीण काळे हा मुख्य संशयित असून त्याने सोमनाथ कोंडाळकर व अजून एकजण यांनी कट रचून बेंच खरेदीची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने अपंग असल्याचे सांगून स्विफ्ट कारमध्ये बसवून अपहरण केले होते.


असा झाला खुनाचा उलगडा 
उद्योजक सोनवणे यांचे अपहरण करुन मालेगाव येथील कालव्यात मृतदेह टाकण्यात आला होता. मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे हेमंत पाटील यांनी सदर माहिती नाशिकरोड पोलिसांना कळविल्यानंतर शवविच्छेदनात खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. तपास सुरु असताना नाशिकरोड पोलिसांनी सोनवणे यांच्या मोबाईल वरुन दोन हजार रुपयांचा व्यवहार व मोबाईल दुकानातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे समजले होते. दरम्यान वरीष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरुन गुरुवारी अंबड परिसरातून एकाला ताब्यात घेतले. त्याची कसून विचारपूस केल्यानंतर रात्री दोन पथके मालेगाव व चाळीसगाव येथे रवाना झाले. शुक्रवारी (दि.30) पहाटेच्या सुमारास चाळीसगाव येथून मुख्य आरोपी ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले आहे.