Kotamgaon Jagdamba : नाशिक (Nashik) जिल्ह्यात देवीची विविध स्थाने पाहायला मिळत असून येवला तालुक्यातील (Yeola) कोटमगाव येथील जगदंबा माता (Jagdamba Mata) प्रसिद्ध आहे. राज्यातील जगदंबेची 51 शक्तीपिठापैकीच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही देवींचे एकरूप असलेले स्थान म्हणजेच कोटमगावची (Kotamgaon) जगदंबा होय. येवले शहरापासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेले भाविकांचे श्रद्धास्थान. हे देवस्थान अतिशय जागृत व जाज्वल म्हणून परिचित आहे. 


श्री क्षेत्र जगदंबा देवस्थान कोटमगाव हे सेनापती तात्या टोपेंची (Tatya Tope) जन्मभूमी म्हणूनही येवला शहराची ओळख आहे. याच येवला शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर कोटमगाव असून, मुख्य रस्त्यापासून जवळच उजव्या बाजूला नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गालगत नारंदी नदी काठावर जगदंबामातेचे मंदिर वसलेले आहे. कोटमगावची देवी जागृत असून, ही देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे देवस्थान अतिशय जागृत व जाज्वल म्हणून परिचित आहे. येथे मातेची स्वयंभू तीन फुट उंचीची शेंदूर लेपित मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. महाकाली, महलक्ष्मी, महासरस्वती हे तीनही रूप एकाच ठिकाणी पहावयास मिळत असल्याने येथे विशेष महत्व आहे. सप्तश्रुंग, माहूर, व तुळजापूर या तीन क्षेत्रांचे उगमस्थान कोटमगावची जगदंबा माता आहे, तर काहींच्या मते ही महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तिघींचे एकरूप आहे. 


जगदंबेच्या स्थापनेचा काळ निश्चित नसला तरी येवला शहर वसण्याच्या शेकडो वर्ष अगोदरचे हे जागृत देवस्थान आहे. नारंदी नदीतिरी वसलेले अतिशय निसर्गरम्य असे पवित्र स्थान नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद या जिल्ह्यांच्या सीमारेषे नजीकचे देवस्थान असल्याने येथे भक्तांची नेहमीच वर्दळ दिसून येते. मातेचे अतिशय प्रशस्त असे मंदिर असून मंदिराचा कळस लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेतो. मंदिराचे समोरच भव्य हॉल असून नेत्रदीपक अशी दीपमाळ उभी आहे. तसेच बाहेरील बाजूस असलेले दोन भव्य महाद्वार देवस्थानच्या वैभवात भर घालतात. सन 1958 मध्ये कोटमगावच्या देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यापूर्वी याच जागेवर लाकडी बांधणीचे मंदिर होते. हल्ली बांधण्यात आलेले मंदिर सिमेंट काँक्रीटचे आहे. 


यात्रा काळात मातेला नवनवीन प्रकारच्या पैठण्या साड्या परिधान केल्या जाऊन सोन्या चांदीचे अलंकार चढविले जातात. पुष्पमालांची सजावट केली जाते. मातेचा नैवद्य चांदीच्या ताटात व चंदनाच्या पाटावर अशा शाही थाटात दाखविला जातो. मातेचे तेजस्वी व मोहक रूप पाहून भक्तगण भारावून जातात. उदे ग अंबे उदे आई उदे ग अंबे उदे चा जयजयकार होतो. महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण भारतातून भक्तांचा महासागर या ठिकाणी पहावयास मिळतो. नवसाला पावणारी माता अशी या देवस्थानची ख्याती असल्याने घटी बसण्याची अतिशय जुनी व तुलनेने सर्वाधिक अशी परंपरा दिसून येते. 


अशी आहे कोटमगावच्या देवीची आख्यायिका 
महासती वृंदा हिचा पती दैत्यराज जालींधर हा सती वृंदाच्या प्रभावाने त्रिलोकी विजयी झाला. सती वृंदाच्या तपसामर्थ्याने अपयश न आल्याने त्याने सामांध होऊन देवलोकावर स्वारी केली. त्यामुळे सर्व देवांनी श्री विष्णूचा धावा केला. श्री विष्णूंनी जालींधराच्या यशाचे सामर्थ्य सती वृंदेचे सतीत्व असल्याचे ओळखले. सर्व देवांच्या रक्षणासाठी श्री भगवान विष्णूंनी जालींधराचे रूप धारण केले व सतीचे शील हरण केले. शिलहरण झाल्याबरोबर दैत्यराज जालींधर पराभूत झाला. त्याचा मृत्यू झाला. जालींधराचा मृत्यू झाल्या बरोबर सतीने विष्णूंना ओळखले. तुम्ही शालीग्राम होऊन पडाल असा शाप दिला. शापाने विष्णू शालीग्राम होऊन कोटमगावी पडले. श्री विष्णूंचा शोध करीत देवी श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती यांच्याकडे गेल्या तेथे श्री विष्णू नसल्याने दोघी परत महाकालीकडे गेल्या तेथेही विष्णू नसल्याने तिघीही शोधावयास निघाल्या आणि शोधता शोधता तिघींना विष्णू कोटमगावी शालीग्राम रुपात दिसले. त्यांनी सतीवृंदेचा उद्धार करून विष्णूंना शाप मुक्त केले आणि तिघींनी ह्या स्थळी म्हणजे कोटमगाव येथे रज, तम आणि साम अशा त्रिगुणात्मक रुपात वास करू लागल्या, असे हे जगदंबा मातेचे स्थान.


नवरात्रीत होणारे कार्यक्रम 
सकाळ व सायंकाळ महाआरती करण्यात येऊन दररोज विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येवल्याच्या आणि तालुका परिसराच्या धार्मिकतेला या दिवसात उधान येते. येथील यात्रा अतिशय वैशिष्ट्‌या पूर्ण असून येथे विविध प्रकारच्या खेळण्यांच्या दुकानाबरोबरच मिठाईची दुकाने तसेच प्रसादाची दुकाने दिसतात. पाळणे व अन्य दुकाने यात्रेच्या आकर्षणात भर घालतात. घटी बसणार्‍या भाविकांसाठी मोफत ने-आण करण्याची विविध संस्थानकडून व्यवस्था केली जाते. येवला-कोटमगाव हा ३ कि.मी. रस्ता यात्रा काळात भाविकांनी दुतर्फा भरून वाहत असतो. यात्रा काळात हजारो भाविक नऊ दिवस श्रद्धेनुसार शंकरपाळे, खारका यांची देवीसमोर उधळण करतात. हा प्रसाद म्हणून झेलणार्‍याचीही याप्रसंगी झुंबड उडते.