Igatpuri GhatanDevi : इगतपुरी (Igatpuri) तालुक्याचा स्वर्ग समजला जाणारा कसारा घाट (Kasara Ghat), धरण परिसर, निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरुन दिलेली वनराई...मंद मंद धुंद करणारा पाऊस...क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण असलेले इगतपुरी अनेकांना भावते. त्याचबरोबर इगतपुरी कडून कसारा घाटाच्या माथ्यावर घाटनदेवीच्या (GhatanDevi) सानिध्यामुळे तर त्या पावित्र्यात अधिक भर पडली आहे. मुंबई आग्रा महामागावर नाशिक मार्गे मुंबईकडे (Mumbai) जातांना अत्यंत नागमोडी वळणाचा  निसर्गाने बहरलेला कसारा घाट आहे. इगतपुरीच्या परिसरात प्रवेश करतांनाच थळ घाटाच्या पायथ्याशी शिवकालीन काळापासुन प्राचीन असे देवीचे मंदिर आहे. घाटात देवीचे स्थान असल्यामुळे घाटनदेवी असे म्हणुन ते सुप्रसिद्ध झाले आहे. 


शैल पुत्री (Shailputri) घाटनदेवीचे रूप अत्यंत विराट आहे. संकटसमयी भक्तांच्या मदतीला धावणारी व नवसाला पावणारी म्हणुन घाटनदेवीचा महीमा आहे. घाटनदेवी मातेचा श्रीदुर्गा सप्तशतीमध्ये शैलपुत्री, ब्रम्हाचारीणी, चंद्रघाटा, कृष्णाडा, स्कंदमाता, कात्यायानी, कालरात्री, महागिरी, महासिध्दी, महागौरी, व रिद्धी - सिद्धी असे विवध रुपे आहेत. यातील पहीले रुप म्हणजे शैलपुत्री म्हणजेच घाटनदेवी माता होय. प्राचीन माहीतीनुसार देवी वजरेश्वरीहुन भीमाशंकरकडे येण्यास निघाली. त्यावेळेस रस्त्यात देवीने या ठिकाणी विश्रांती घेतली व ती येथेच स्थिर झाली तीच ही घाटनदेवी होय. शैलाधिराज तनया म्हणुन या देवीची मोठी ओळख आहे. 


नवसाला पावणारी शैल पुत्री घाटनदेवी म्हणुन देवीची ख्याती आहे आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर येथे प्रत्येक भाविक पितळीघंटा देवीचरणी वाहतो तर बरेच भाविक येथे जाऊळ, सत्यनारायणं पुजन , दुर्गासप्तशती पठण, पारायणे करुन नवसाची पूर्ति करीत असतात तर प्रत्येक निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ येथेच वाढविण्यात येत असतो त्यामुळे घाटनदेवी माता तालुक्याचे ग्रामदैवत बनले  आहे नवरात्रीच्या काळात येथे नगर, जव्हार, मोखाडा,मुंबई, ठाणे,कल्याण, जळगाव,भुसावळ,औरंगाबाद, मालेगाव, अमळनेर,चोपडा, राजूर, अकोले,जालना,बीड,परांडा, व आदी भागातील भाविकांची उपस्थिती लक्षवेधी असते .


अशी आहे आख्यायिका 
वजरेश्वरीहुन भीमाशंकरकडे प्रयाण करीत असतांना देवी येथे विश्रांती साठी थांबली. अशी प्राचीन माहीती आहे . घाटमाथ्यावरील निसर्ग सौंदर्य पाहून मोहीत झालेल्या देवीने येथे मुक्काम ठोकला, अशी आख्यायिका सांगितली जाते. या मंदिरासमोरच उंटदरी नावाचे सृष्टीसौदंर्याने नटलेले ऐतिहासिक स्थान आहे. छ. शिवाजी महाराजांनी कल्याणचा खजिना लुटुन याच उंटदरीत लोटले होता. यामुळे या दरीला उंटदरी असे नाव पडले आहे. त्याचा अपभ्रंश उंटदरी असा झाल्याचे इतिहासात नमूद आहे. कोणताही सह्रदयी माणुस या ठिकाणी आल्याबरोबर अगोदर सृष्टीसौंदर्याकडे लक्ष देतो विशेषता  मुंबईकडे आणि नाशिककडे ये- जा करणारे वाहनातील प्रवाशी तर इतके भारावतात की, त्यांना सौंदर्यक्षण टिपुन घेण्याचा मोहच आवरता येत नाही


छत्रपती शिवाजी महाराजांनी केली पुजा 
जव्हारकडुन पुण्याकडे मावळ प्रातांत जाणारा अतिदुर्गम रस्ता याच उंटदरीतुन होता. भातसा नदीचा उगम याच दरीतुन झाला आहे. उंटदरीपासुन जवळच असणाऱ्या घाटनदेवी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shiwaji Maharaj) कल्याण मार्गे थळ घाटात आले होते. या काळात शिवाजी महाराज यांनी आपल्या मावळयांसह घाटनदेवीची यथासांग व शास्त्रोक्त पुजा अर्चा करून देवीचे दर्शन घेतले असल्याची नोंद इतिहासात नमूद आहे.  देवीचे लोभस आणि तेजस्वी रुप आजही भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रस्थानी आहे. वाघावर रूढ असलेली घाटनदेवी माता भक्तांना प्रसन्न मुद्रेने आशिर्वाद देऊन पुढील प्रवास सुखाचा होवो, याचे वरदान देते. म्हणुनच मंदिराच्या आसपास आजपावेतो कुठलाही आघात वा अपघात घडला नाही आणि गावावरही विशेष संकट आले नाही अशी स्थानिकांची धारणा आहे. 


मंदिराचा जिर्णोद्धार व शाश्वत स्थापना 
वैदीक काळापासुन देवीची येथे स्थापना झाल्याचे नमुद आहे. घाटनदेवीचा पूर्वी जुन्या ठिकाणी तांदळा होता तो जसा होता तसाच आजही कायम आहे. पूर्वापार असलेले जीर्णमंदिर पडुन गेल्याने गावातील जेष्ठ श्रेष्ठ भाविकांनी विचार करुन लगेच नव्या मंदिराच्या कामास सुरुवात केली. दोन ते तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मंदिराची उभारणी करण्यात आली. 1980 रोजी देवीच्या मूर्तिची प्रतिष्ठापना जेष्ठ समाजसेवक ब्रीजलाल रावत यांच्या हस्ते करण्यात आली हे देवस्थान 1996 मध्ये धर्मादाय आयुक्तकडे नोंदणीकृत करण्यात आले आहे. विश्वस्त म्हणुन नउ जणांचे मंडळ कार्यरत आहे. नवरात्र उत्सवात या ठिकाणी नउ दिवस यात्रा भरते म्हणुनच राज्याच्या विविध भागातुन भाविक दाखल होतात. येथे भाविकांची पहाटे पाच पासुन ते रात्री दहा पर्यतं दर्शनासाठी गर्दी होत असते.