Nashik Temperature : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील तापमानात काही दिवसांपासून वाढ झाल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आज अचानक या तापमानात चार अंशांची घट होऊन नाशिककरांना हुडहुडी भरली. कालपर्यंत थंडीचा पारा 14 अंशावर असताना आज थेट 10 अंशावर (Temperature) येऊन पोहचल्याने कमालीची थंडी जाणवली. शिवाय निफाड परिसरात 7.2अंश तापमानाची नोंद करण्यात आली.
मागील आठ दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यात तापमान कमी अधिक प्रमाणात वाढत असल्याने थंडीने (cold) काढता पाय घेतल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. कधी 15 तर कधी 14 तर कधी 16 अंशावर तापमान होते. त्यामुळे शेकोट्यांचे प्रमाणही कमी झले होते. मात्र आज अचानक चार अंशांनी पारा घसरल्याने सकाळपासून हवेत कमालीचा गारवा पसरल्याचे जाणवले. आज नाशिक शहराचे तापमान 10 अंशावर गेले आहे. तर जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला 7.2 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यांत अचानक प्रचंड थंडी जाणवत असून सकाळी बाहेर फेरफटका मारणाऱ्यांच्या संख्येतही आज घट झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कमालीची थंडी जाणवत होती. मात्र डिसेंबर उजाडल्यानंतर तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. सोमवारपासून तापमानाचा आलेख चढता आहे. यामध्ये सोमवारी तापमान 15.4 अंश, मंगळवारी 18.8अंश, बुधवारी 16 अंश, गुरुवारी 14.8 अंश तर आजचे तापमान ते थेट 10 अंशावर आले आहे. तर नाशिक जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला 7.2 तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
निफाडला आल्हाददायक वातावरण
नाशिक शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडल्याने कुठे शेकोट्या, कुठे जिम, जॉगिंग ट्रकला गर्दी पाहायला मिळत आहेत. तर अनेकजण थंडीमुळे घरातच थांबणे पसंत करत आहेत. तर दुसरीकडे नाशिकच्या निफाड (Niphad) तालुक्यातील चांदोरी सायखेडा परिसरात थंडीमुळे सकाळी आल्हाददायक वातावरणाची अनुभूती मिळत आहे. गोदावरीच्या नदीच्या काठावर निफाड तालुक्यातील चांदोरी सायखेडा ही गावे वसलेली असून या ठिकाणी थंडीचा कमी अधिक प्रमाणात असल्याने सकाळचे आल्हाददायक वातावरण पर्यटकांना खुणावत आहे.
तापमानात झालाय बदल
नाशिकसह जिल्ह्यात अचानक तापमानात घट झाल्याने कडाक्याच्या थंडीमुळे नागरिक गारठले असून शेकोट्या पुन्हा पेटू लागल्या आहेत. अशातच आता हवामान विभागाने ऐन थंडीत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून पुढील काही दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दिसू लागले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 15 डिसेंबरपर्यंत कधीही पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 11 ते 14 डिसेंबर या कालावधीत राज्यात पावसाची शक्यता अधिक आहे.