Nashik Majhi Vasundhara : नाशिकच्या (Nashik) इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीने (Shirsathe Grampanchayat) यंदाच्या वर्षांतील 'माझी वसुंधरा ३.०' या स्पर्धेत राज्यात प्रथम तर नाशिक तालुक्यातील शिंदे आणि निफाड तालुक्यातील विंचूर ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या गटात राज्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे. या अभियानात सलग तिसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय बक्षिस मिळवले असून यावर्षी तीन ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला.


माझी वसुंधरा अभियान (Majhi Vasundhara) सुरु झाल्यापासून या अभियानात राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये नाशिक (Nashik) जिल्हयाचा नावलौकिक राहिला आहे. पहिल्या वर्षी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर दुसऱ्या वर्षी याच ग्रामपंचायतींने पुन्हा राज्यात प्रथम क्रमांक तर निफाड तालुक्यातील चांदोरी आणि इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला होता. अभियानाच्या या तिसऱ्या जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली असून पर्यावरणपूरक गाव करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावर्षी इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे, निफाड येथील विंचूर आणि शिंदे या ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केला आहे.


दरम्यान 2 ते 5 हजार लोकसंख्या असलेली शिरसाठे ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली असून 5 ते 10 हजार लोकसंख्या विभागामध्ये शिंदे ग्रामपंचायत राज्यात तृतीय तर लोकसंख्या 10 हजारापेक्षा जास्त असलेल्या विभागामध्ये विंचूर राज्यात तृतीय आली आहे. भूमी घटकाबाबत शिरसाठेला विशेष पुरस्कार पण मिळाला आहे. मुंबई येथील नरिमन पॉईंटजवळील टाटा थिएटर येथे आयोजित या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हसते आज पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 


'या' कामांच्या आधारावर निवड 


महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वाच्या आधारे राबविण्यात येणाऱ्या या अभियानात नाशिक जिल्हयातील सर्व  ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, वायू तत्त्वासाठी प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच नदी-नाले यांची स्वच्छता करणे, ऊर्जा बचत, अपव्यय टाळणे यासारख्या पर्यावरणीय घटकांवर काम करण्यात आले. 


अभिमानाची आणि आनंदाची बाब : आशिमा मित्तल


"माझी वसुंधरा अभियानात सलग तिस-या वर्षी जिल्हयाला तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. जिल्ह्यात पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि पर्यावरणसमृद्ध गाव करण्यासाठी लोकसहभागातून चांगली काम करण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे देखील करण्यात येत आहेत. अभियानासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींना या अभियानात करावयाच्या कामांविषयी माहिती तसेच नियेाजन करुन देण्यात आले. सर्व गावांचे ‘गाव कृती आराखडे’ तयार करुन त्यानुसार अंमलबजावणी करण्यात आली.