नाशिक: सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या प्रकरणात आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईवडिलांचे अंत्यसंस्कार संशयितांच्या घरासमोरच केले आहे. मुलीचे अपहरण झाल्यापासून इगतपुरी तालुक्यातील भरविर गावात तणावाचे वातावरण आहे. दुसरीकडे पोलिसांकडून अद्यापही संशयितांचा शोध सुरू आहे. 


सिन्नर शहराजवळील घोटी-पांढुर्ली रोडवरील रविवारी आईवडिलांसह दुचाकीवरून जात असताना 19 वर्षीय मुलीचे चारचाकीतून आलेल्या तरुणाने आपल्या साथीदारांसह अपहरण केल्याची घटना घडली होती. रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास नाशिकच्या घोटी - पांढुर्ली महामार्गावरून अपहरण केले होते. तसेच आई वडीलांना धक्काबुक्कीही करण्यात आली होती. संबंधित तरुणाकडून मुलीकडे लग्नासाठी वांरवार तगादा लावला जात असल्याने तरुणाच्या सर्व त्रासाला कंटाळून मुलीच्या आई वडिलांनी एक तासाभरात टोकाचा निर्णय घेतला होता. त्यांनी रेल्वेखाली स्वतःला झोकून देत जीवन संपवले होते.


दरम्यान, या घटनेनंतर रात्री उशिरा सिन्नर पोलीस ठाण्यात मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार अपहरण करणाऱ्या समाधान झनकर या तरुणासह त्याच्या साथीदारांवर अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मात्र मुलीचे आईवडील राहत असलेल्या इगतपुरी तालुक्यातील भरविर येथे दोघांचेही मृतदेह नेण्यात आले. मात्र जोपर्यंत संशयितांना ताब्यात घेत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. शिवाय ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. दिवसभर गावातील वातावरण तापलेले होते. अखेर दुपारनंतर ग्रामस्थांकडून संशयितांच्या घरासमोरच निवृत्ती खातळे आणि मंजुळा खातळे यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. 


नेमकं प्रकरण काय? 


समाधान झनकरचं 19 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. त्याच्याकडून तरुणीकडे लग्नासाठी वारंवार तगादा लावला जात होता. त्यातच रविवारी दुपारी एकच्या सुमारास संबंधित तरुणी आई वडिलांसोबत दुचाकीवरुन प्रवास करत असताना, समाधान झनकरने आपल्या साथीदारांसह तिचं अपहरण केलं होतं. तर काही दिवसांपासून सतत या तरुणांकडून लग्नासाठी तगादा होता, यामुळे कंटाळलेल्या आई वडिलांनी एक तासातच भगूर नानेगाव रेल्वे ट्रॅकवर गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केली होती.


घरासमोर केले अंत्यसंस्कार


दरम्यान या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी आज दुपारी खातळेंचे मृतदेह घेऊन भरवीर गावातच संशयित झनकर याच्या घरासमोर नेऊन अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. चोख पोलीस बंदोबस्तही यावेळी तैनात करण्यात आला होता. अपहत मुलीचा आणि संशयितांचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात असून पथके रवाना करण्यात आली आहेत, प्रकरण संवेदनशील असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सर्व बाजूने तपास केला जात आहे.


ही बातमी वाचा :