Nashik Bribe : नाशिक शहरात दिवसेंदिवस लाचखोरीच्या (Bribe) घटनांनी ऊत आणला आहे. एकीकडे नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासकीय कार्यालये, अधिकारी कार्यरत असताना हेच अधिकारी पैशांशिवाय काम करत नसल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे. यात महसूल विभागासह शिक्षण त्याचबरोबर पोलीस प्रशासनातील अधिकारी वर्ग देखील लाच घेताना रंगेहाथ आढळून येत आहेत. त्यामुळे तक्रार करायची तरी कुठे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.
दरम्यान नुकतेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) शिक्षण विभागात महत्वाची कारवाई करण्यात आली. मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhangar) यांना पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. आता याच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस शिपायाला ताब्यात घेतले आहे. येवला तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय नारायण शिंदे याला तीन हजार रुपयांची तर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे शिपाई करण गंभीर थोरात याला 4000 रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
येवला तालुका ग्रामीण पोलीस (Yeola Police Station) ठाण्यात कार्यरत असलेल्या विजय नारायण शिंदे या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदाराच्या पत्नीने येवला तालुका पोलीस स्टेनशमध्ये दिलेल्या अदखलपात्र तक्रारीवरुन, संशयितावर कारवाई करण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र तक्रार अर्जानुसार दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून चार हजार रुपये लाचेची मागणी शिंदे यांनी केली होती. यातील तीन हजार रुपयांचा पहिला हफ्ता पंचायत समक्ष स्वीकारताना शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचारीही आघाडीवर
तर मालेगाव शहरातील (Malegaon) तालुका पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे. तक्रारदाराच्या बहिणीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याकरता चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना तालुका पोलीस ठाण्याचा कर्मचारी करण गंभीर थोरात यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर मंगळवारी (6 जून) ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या बहिणीविरुद्ध दारुबंदी कायद्यांतर्गत मालेगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे पोलीस कर्मचारी करण थोरात यांनी चार हजार रुपये मागितले होते. पंचायत समक्ष लाच स्वीकारताना संशयित सापडल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.