Nashik Kapaleshwer Mandir : नाशिक शहर (Nashik) असो किंवा जिल्हा धार्मिक परंपरेचा मोठा वारसा आपल्याला लाभला आहे. प्रत्येक गावात पुरातन मंदिरे आपल्याला आढळून येतात. नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक महादेव मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) दर्शनासाठी प्रचंड गर्दी आहे. नाशिकसह जिल्ह्यात अनेक शिवमंदिरे असून आज भक्तिभावाने भाविक दर्शन घेत आहेत.
नाशिक (Nashik) शहरात अनेक महादेवाची मंदिरे असून यातील एक महत्वाचं मंदिर म्हणजे कपालेश्वर महादेव (Kapaleshwer Mahadeo Mandir) मंदिर होय. बाराही महिने या मंदिरात भाविकांचा ओघ सुरु असतो. कारण कपालेश्वर मंदिराचे वेगळेपण आहे. जगभरात कोणत्याही शिवमंदिरात दर्शनासाठी गेलात तर तुम्हाला शिवमंदिराबाहेर नंदी हमखास दिसून येतो. मात्र नाशिकचं कपालेश्वर मंदिर हे जगभरात एकमेव मंदिर असेल कि ज्या शिवमंदिरात नंदी आढळून येत नाही. याला कारणही विशेष आहे, ते जाणून घेतलं पाहिजे.
नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील (Panchavati) गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. देशातील सर्वच महादेव मंदिरात नंदी पाहायला मिळतो. मात्र नाशिकच्या ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिर याला अपवाद आहे. महादेवांचं हे एकमेव मंदिर आहे, ज्याठिकाणी नंदीच नाही. महादेवांना ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं. नंदीनं त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं. याठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं पातक दूर झालं आणि ते ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीने मुक्ती दिली, यामुळेच नाशिकच्या पवित्र भूमीत महादेवांनी नंदीला आपला गुरु मानल्याचे सांगितले जाते.
कपालेश्वर मंदिराला सातशे वर्षांची परंपरा
नाशिक शहरात अनेक पुरातन मंदिराचा वारसा जपला जातो. अनेक हजारो वर्षांपासूनची मंदिरे शहरात पाहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे कपालेश्वर महादेव मंदिर. या कपालेश्वर महादेव मंदिराला जवळपास सातशे वर्षांचा इतिहास आहे. नाशिक शहरात गोदावरी किनारी, रामकुंड परिसरात श्री कपालेश्वर महादेव मंदिर वसलेले आहे. नाशिक पर्यटनासाठी येणारे लाखो भाविक इथ दर्शनासाठी येत असतात. श्री कपालेश्वर महादेव मंदिराचं असही एक महत्व सांगितलं जात की, 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर जितकं पुण्य मिळतं, तितकं पुण्य श्री कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर मिळते.
काय आहे आख्यायिका?
कपालेश्वर महादेव मंदिराची आगळीवेगळी आख्यायिका पद्मपुराणात असल्याचे स्थानिक सांगतात. या आख्यायिकेनुसार पद्मपुराणात सांगितलंय की, शिव शंकराला ब्रह्म हत्येचं पातक लागलं होत, ते तिन्ही खंडात फिरुनही त्यांना प्रायश्चित सापडत नव्हते. अखेर नंदीने शिव शंकरांना सांगितलं की, नाशिकला अरुणा, वरुणा गोदावरी संगम आहे. या पवित्र स्थळी जाऊन आपण स्नान करावं, त्यानंतर तुमच्या माथ्यावरील ब्रह्म हत्येचं पातक नष्ट होईल. नंदीच्या सांगण्यावरुन भगवान शंकरानी नाशिकमधील गोदावरी अरुणा वरुणा नदी संगमावर स्नान केले. त्यानंतर त्यांचं ब्रह्म हत्येचं पातक नष्ट झाले, त्यामुळे एक आदर म्हणून भगवान शंकरांनी नंदीना सांगितलं. तुम्ही कायम माझ्यासोबत असता, मात्र तुम्ही इथे माझ्यासमोर नसावं, नंदींनी भगवान शंकराची ही विनंती मान्य केली. त्यामुळे इथे भगवान शंकरासमोर नंदी नसल्याचे अशी एक कथा आहे.