Nashik Zarif Baba : अफगाणिस्तानातील (Afghanistan) नागरिक असलेले मुस्लिम धर्मगुरू झरीफ अहमद सय्यद चिस्ती यांची मागच्या पंधरवड्यापूर्वी नाशिकच्या (Nashik) येवला तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) या गुन्ह्याचा छडा लावत चौघा संशयितांना बदलापूर मधून ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता चिस्ती बाबाचा मृतदेह मूळ गावी रवाना होत आहे. मुंबई मार्गे अफगाणिस्तान जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 


दरम्यान काही दिवसांपूर्वी जरीफ बाबा यांचा खून करण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्या मृतदेहावर पुढील सोपस्कार पार पडण्याची प्रक्रिया पुढे जात नव्हती. त्यामुळे जरीफ बाबांच्या मृतदेहाचा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला होता. आता जरीफ बाबाच्या मृतदेहाचा दफनविधीसाठीचा तिढा सुटला आहे. मृतदेहात त्यांच्या मूळ गावी अफगाणिस्तान घेऊन जात असल्याची माहिती मिळाली आहे. अंत्यविधीसाठी अफगाणी दूतावासांची संपर्क साधण्यात आला आहे. आज सायंकाळपर्यंत मृतदेह नाशिक सिव्हिल हॉस्पिटल (Nashik civil Hospital) मधून रवानगी करण्यात येणार आहे. 


चिस्ती यांच्या खुनाच्या घटनेला सुमारे दोन आठवडे उलटूनही अद्याप त्यांचा मृतदेह नाशिकमध्येच होता. त्यांचे नातेवाईक नाशिकमध्ये पोहोचू न शकल्यामुळे हा मृतदेह सांभाळण्याची वेळ पोलिसांवर आली होती. मात्र आता चिस्ती यांचा मृतदेह थेट अफगाणिस्तान येथे पाठवण्यात येणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. झरीफ बाबांच्या दफनविधी बाबत अफगाणिस्तान दूतावास कार्यालयाकडून पोलिसांना ठोस असा ग्रीन सिग्नल मिळत नव्हता. अफगाणिस्तानचे नागरिक असल्यामुळे त्यांचा दफन विधी करण्यासाठी दूतावास कार्यालयाकडून प्रक्रिया पार पडणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. अफगाणिस्तानातून भारतात येण्यासाठी बाबांचे वडील किंवा अन्य कुटुंबीयांना व्हिझा मिळत नसल्याने त्यांचे मार्ग बंद झाला होता. 


अशी घडली होती घटना 
दरम्यान पाच जुलै रोजी जरी बाबांचा डोक्यात गोळी झाडून खून करण्यात आला होता. येवल्यातील चिंचोडी औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली होती. या प्रकरणी येवला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून काही आरोपींना अटकही करण्यात आले आहे. झरीफ बाबा यांचा मृतदेह अफगाणिस्तानला घेऊन जाण्यासाठी त्यांचे काही नातलग नाशिकमध्ये पोहोचणार होते. परंतु त्यांना पोहोचण्यास विलंब झाल्याने हा मृतदेह अजूनही खाजगी सभागृहात सांभाळण्याची वेळ पोलिसांवर आली होती. मात्र आता चिस्ती यांचा मृतदेह थेट अफगाणिस्तानला पाठवण्यात येणार आहे. 


दफन विधीचा मार्ग मोकळा 
सूफी संत ख्वाजा सय्यद झरीफ अहमद चिस्ती उर्फ झरीफ बाबा यांच्या दफनविधीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यांचा दफन विधी अफगाणिस्तानात होणार असून त्यासाठी त्यांचा मृतदेह आज मुंबईत पाठवला आहे. तिथे एका नामांकित खाजगी रुग्णालयात पुढील प्रक्रिया झाल्यावर परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीने अफगाणिस्तानात पाठवला जाईल. दरम्यान आत्तापर्यंत त्यांच्या मृतदेह खाजगी नव्हे तर केंद्रीय यंत्रणेच्या एका कोल्डरूम मध्ये ठेवण्यात आला होता.