Nashik News : नाशिक महापालिकेने (Nashik NMC) पुन्हा एकदा शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यास सुरवात केली आहे. शहरातील शालिमार परिसरातील अनधिकृत दुकाने हटविण्यात आली आली असून पोलिसांच्या बंदोबस्तात (Nashik Police) अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी अतिक्रमण काढतेवेळी व्यावसायिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले तर परिसरातील नागरिकांना स्वागत केले आहे.
नाशिक (Nashik) शहरातील महत्वाच्या मार्गावर ठाण मांडलेली अनधिकृत बांधकामे (Unauthorized constructions) तसेच अतिक्रमणांवर हातोडा टाकण्याचा निर्णय महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (Chandrakant Pulkundwar) यांनी घेतला आहे. त्यानुसार आज नाशिकच्या शालिमार (Shalimar) परिसरातील अनधिकृत दुकानं हटविण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. सकाळपासून पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे. कबरस्तानच्या जागेवर अनेक दुकानं थाटण्यात आली होती. अतिक्रमण काढू नये, यासाठी व्यवसायिक आक्रमक झाले आहेत. याची कल्पना असल्यानं कडक पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे.
शहरातील शालीमार परिसरातील शहाजहानी पीरजादा कब्रस्तानला लागून असलेल्या अनेक दुकानांवर अतिक्रमण विभागाने आज सकाळपासून हातोडा फिरवण्यास सुरवात केली. यामुळे या परिसरातील सुमारे पंचवीस ते तीस दुकानांचे अतिक्रमण धोक्यात आले आहे. दरम्यान मनपा व पोलीस प्रशासनाकडून काल संध्याकाळी या दुकानदारांना सूचना देण्यात आली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी नोटीसाही (NMC Notice) बजावण्यात आल्या होत्या, असे समजते. दरम्यान आज सकाळी साडेसहा वाजता मनपाकडून पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. शालिमार येथील कालिदास कलामंदिर रस्त्याच्या कडेला गेल्या अनेक वर्षांपासून असलेली दुकाने महापालिकेने आज पहाटे हटवली. या दुकानामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
नेहमीची वाहतूक कोंडी
दरम्यान शालिमार हा परिसर गेल्या काही वर्षांत अतिक्रमणांनी झाकोळला होता. याच परिसरात कवी कालिदास नाट्यगृह (Mahakavi Kalidas Natyagruha) असून समोरील बाजूस बीडी भालेकर मैदान आहे. तर त्यालाच लागून शहाजहानी पीरजादा कब्रस्तान आहे. मात्र या कब्रस्तानच्या जागेवर अनधिकृत बांधकाम तसेच दुकाने थाटण्यात आली होती. कपडे, शूज इतर दैनंदिन साहित्याची दुकाने असल्याने रोजच या मार्गावर गर्दी होत असते. त्यामुळे महिला वर्गासह तरुण तरुणीची नेहमीच वर्दळ असल्याने अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असे. त्यामुळे महापालिकेने या अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज सकाळपासून अतिक्रमण काढण्यास सुरवात केली आहे.