Nashik Bribe Case : नाशिकच्या (Nashik) जीएसटी विभागात (GST Department) कार्यरत असलेल्या चव्हाणके यास बंद असलेले जीएसटी खाते पुन्हा सुरू करण्यासाठी आठ हजारांच्या लाचप्रकरणी अटक करण्यात आली होती. चंद्रकांत चव्हाणके यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पोलीस कोठडीत होते.
आदिवासी विभागातील कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल (Dineshkumar Bagul) यास लाखांची लाच घेतांना अटक केल्यानंतर नाशिकच्या सीबीआय विभागाने (CBI) देखील धडक कारवाई केली. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सिडकोतील केंद्रीय जीएसटी कार्यालयात सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. त्यानंतर चंद्रकांत चव्हाणके (Chandrakant Chavhanke) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मात्र चव्हाणके यांनी जामिनासाठी अर्ज केला. सुरवातीला जमीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. मात्र आता चव्हाणके यास सशर्त जमीन मंजूर करण्यता आला आहे.
दरम्यान सीबीआयच्या एसीबीने चव्हाणके यास आठ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यावेळी चव्हाणके यांच्यातर्फे जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्याबाबत शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सीबीआयतर्फे ॲड. शिव शंभू यांनी युक्तिवाद करताना चव्हाणके यांच्या जामीन अर्जावर विरोध केला. तसेच जामीन मंजूर झाल्यास या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता वर्तविली.
तर चव्हाणके यांच्याकडून ॲड. राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला. यावेळी ते म्हणाले कि, ज्याचे जीएसटी खाते आहे, त्या व्यक्तीने तक्रारच केली नसून ही तक्रारच संशयास्पद असल्याचे ते म्हणाले. तसेच, ज्या कामाचा उल्लेख करण्यात आला आहे, त्याची जबाबदारी चव्हाणके यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचे सांगत जामीन मंजूर करण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चव्हाणके यांना सशर्त जामीन मंजूर केला. यात 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला. तसेच, पासपोर्ट सीबीआयकडे जमा करून, तपास सहकार्य करण्याचे आदेशही देण्यात आले.
आठ हजारांची लाच घेतांना अटक
ऑगस्टमध्ये आदिवासी विभागातील लाचखोर दिनेशकुमार बागुल यांच्यावर कारवाई झाल्यानंतर नाशिकच्या सीबीआयने देखील जीएसटी अधिकाऱ्यावर लक्ष ठेवून लाच घेतांना पकडले. यामध्ये नाशिकचे जीएसटी विभागाचे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात सापडले. नाशिकच्या सिडको कार्यालयामधून चंद्रकांत चव्हाणके यांना अटक करण्यात आली होती. बंद जीएसटी खाते चालू करण्यासाठी संबधित चव्हाणके यांनी आठ हजारांची लाच मागितल्याचे प्रकरण आहे. .