Nashik Navshya Ganpati : पेशवे काळातील आनंदीबाई जोशी (Anandibai Joshi) या पुण्याहून नाशिकमध्ये (Nashik) आल्या. त्यावेळी मंदिर दुर्लक्षित होते, मात्र जागृत देवस्थान असल्याने आनंदीबाई जोशी यांनी नवस बोलून मुलगा झाल्यास मंदिर बांधण्याचे सांगितले, त्यानंतर आनंदीबाई यांना मुलगा झाल्यानंतर त्यांनी मंदिर बांधले. तेव्हापासून हे गणपतीचे मंदिर नवश्या गणपती (Navshya Ganpati) नावाने प्रसिद्ध झाले. 


नाशिक (Nashik) शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहरात अनेक भागात मंदिरेच मंदिरे पाहायला मिळतात. त्यात गणेश मंदिराचा वेगळाच इतिहास वाचायला मिळतो. नाशिकच्या गंगापूररोडवर (Ganagpaur Road) सोमेश्वर मंदिराच्या अलीकडे नवश्या गणपतीचे मंदिर आहे. नाशिकमधील नवशा गणपती हे जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते. पेशवेकालीन मंदिर असल्याने या मंदिराला 300 वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. पेशवेकाळात आनंदीबाई जोशी  पुण्याहून शनिवार वाड्यातून नाशिकमध्ये आल्या. नाशिक हे आनंदीबाई जोशी यांचे आजोळ असल्याने त्यांनी इथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आनंदीबाई जोशी यांची आजी गोपिकाबाई या गणेश भक्त होत्या. 


याच सुमारास आनंदीबाई जोशी यांनी मंदिरात नवस केला, मुलगा झाल्यास मंदिराची स्थापना करीन. मुलगा झाला, मुलाचे नाव विनायक ठेवले. तेव्हापासून नवश्या गणपती हे नाव पडले. शिवाय मुलगा झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. त्यावेळी या परिसराचे नाव हे चांवडस होते, अस सांगितले. त्यावेळी आनंदीबाई जोशी यांच्या नावावरून या गावास आनंदवल्ली असे नाव देण्यात आले. ते आजतागायत टिकून आहे. त्यानंतर 1774 मध्ये राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी मंदिराची स्थापना केली. दरम्यान मंदिराची स्थापना झाल्यानंतर राघोबादादांनी आनंदवलीस मोठा राजवाडाही बांधला. या राजवाड्याच्या पश्चिमेस उभे राहिल्यास नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. पेशवाई बुडाल्यानंतर आनंदवलीचा वाडाही जाळला. मात्र, परिसरातील मंदिरे शाबूत राहिली. श्री नवशा गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकीर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे. 


मंदिर होते मातीच्या ढिगाऱ्यात 
दरम्यान देशावर इंग्रजांचे आक्रमण झाल्यानंतर अनेक मंदिराची नासधूस करण्यात आली. पेशवेकालीन वाडाही जाळण्यात आला. त्यामुळे नवश्या गणपती मंदिर हे मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक वर्ष तग धरून होते. शेवटी 1985 आनंदवल्लीचे नागरिक युवराज जाधव यांनी हे मंदिर शोधून काढले. त्यानंतर मंदिराची डागडुजी करण्यात आली. काही दिवसानंतर युवराज जाधव यांनी मंदिराची पुनर्बांधणी करण्याचे ठरविले. मात्र 1999 च्या सुमारास जागेवरून वाद झाला. यात गोळीबार झाल्याने युवराज जाधव हे मरण पावले. पुढे जाधव यांचे वंशज राजू जाधव यांनी मंदिर उभारणी केली. तसेच नवशा गणपतीमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच 'हजरत पीर सय्यद संझेशाह हुसैनी शहीद' यांची दरगाह आहे. पिरबाबा दर्गा व नवश्या गणपती अनेक वर्षांपासून परंपरा असून अनेकदा एकत्रित कार्यक्रम केला जातो. 


नवश्या गणपतीचा इतिहास 
नाशिक येथे अनेक पुरातन पेशवेकालीन मंदिर आहेत. यातीलच एक म्हणजे नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेला नवश्या गणपतीचे प्राचीन मंदिर. गंगापूररोडवर सोमेश्वर मंदिराच्या अलीकडे हे मंदिर आहे. नारायणरावांच्या हत्येनंतर आनंदीबाईंना नाशिकजवळील चावंडस गावी ठेवण्यात आले. 1764 साली आनंदीबाईंना पुत्रप्राप्ती झाली. तेव्हा आनंदीबाईंच्या नावावरून सदर गावाचे नामकरण आनंदवली असे केले गेले. त्याच दरम्यान येथे गणपती मंदिर बांधले. तेच हे नवश्या गणपतीचे मंदिर, आजही या ठिकाणची शांतता आणि पावित्र्य टिकून आहे. नदी पात्राकडे पायऱ्या उतरत गेल्यावर पूर्वाभिमुख गणेश मंदिर आहे. 


मंदिर परीसरातील हजारो घंटा 
नवश्या गणेशाची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या हातात पाश आणि फुले असून खालील एका हातात मोदक आणि दुसरा हात अभय मुद्रेत आहे. विशेष मूर्तीच्या मागील भागात असलेले चांदीचे मखर उठून दिसते. नवश्या गणपतींचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो भाविक या ठिकाणी नवस मागण्यासाठी येत असतात. नवस पूर्ण झाल्यास मंदिराबाहेरील खांबाना घंटा बांधण्याची परंपरा आजही टिकून आहे. त्यामुळे सभामंडपाचे खांब अनेक घंटांनी भरून गेले आहेत. तसेच मंदिर हे पूर्वी जंगल भागातच होते, कालातंराने वस्ती वाढू लागल्याने जंगल कमी झाल्याचे दिसते. मात्र आजही मंदिर सभोवताली गर्द झाडी, लागूनच नदीपात्र आणि नीरव शांतता यामुळे भाविकांबरोबर पर्यटकांनाही हे स्थळ आकर्षित करते.