Nashik Nana Patole : एवढ्या कालावधींनंतर फडणवीसांना आता हे का सुचले? आमचे मित्र आता उपमुख्यमंत्री आहेत. जनतेचे मूळ मुद्दे डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. फडणवीस यांना जेलमध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) टाकणार होती, या गौप्यस्फोटावर पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून फडणवीस यांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. आज 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात राज्यासाठी आपलं व्हिजन मांडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला की, ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस म्हणाले की, "गेल्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या तसेच मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे (Sanjay Pandey) यांना देण्यात आलं होतं. अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं की, ज्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकले नाहीत. यावर पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 


ते यावेळी म्हणाले, फडणवीस यांना हे आताच का सुचले? आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून? हा निव्वळ जनतेचे मूळ मुद्दे भरकटविण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. याचबरोबर पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधताना म्हणाले की, वाघ बिबटे गुजरातला नेत आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात सूरत लूट होत होती, आता राज्याला लुटून गुजरातमध्ये सुरतेला देण्याचे काम सुरू आहे. तसेच हे सरकार शिवाजी महाराज यांच्या विचाराच्या  विरोधात काम करत आहे. भाजपला उमेदवार का मिळाला नाही, हे तुम्ही का दाखवत नाही? आम्ही प्रामाणिक आहोत तर अप्रामाणिक लोकांनी आरोप करू नये. आज त्यांचे दिवस आहे उद्या आमचे दिवस येतील. आम्ही विचारांची लढाई लढतो आहे. मात्र दुसऱ्याची घर फोडायला भाजपला आवडत. मात्र जेव्हा त्यांचं घर फुटेल तेव्हा त्यांना कळेल, असा इशारा देखील यावेळी नाना पटोले यांनी दिला.  


हा घरातला वाद आहे, काँग्रेस पक्षाचा नाही... 


तर नाशिक पदवीधर निवडणुकीवर ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणणे हे आमचे दायित्व आहे. त्यामुळे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. त्याचबरोबर सत्यजीत तांबे यांनी पक्ष विरोधी भूमिका घेतल्या प्रकरणावर ते म्हणाले की, जे पक्षाने आदेश दिले आहेत ते जर मानत नसेल तर त्यावर कारवाई होईल. मी म्हणजे पार्टी नाही, त्यामुळे नाशिकलो आलो म्हणजे मनधरणी करायला आलेलो नाही. पक्षाने उमेदवारी सुधीर तांबे यांना जाहीर केली होती, त्यानुसार कोरा एबी फॉर्म पाठवला होता, मात्र ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. मात्र तत्पूर्वी सुधीर तांबे हे उभे राहतील, हे सुरवातीला सांगितलं होतं. वडिलांना तिकीट मिळाले म्हणून मुलाने अपक्ष फॉर्म भरला. हा घरातला वाद आहे, काँग्रेस पक्षाचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.