Devendra Fadnavis Majha Vision : ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस म्हणाले की, "गेल्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या, मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे (Sanjay Pandey) यांना देण्यात आलं होतं. अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं की, ज्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत."


एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांनी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात प्रश्न विचारला. त्यावेळी उत्तर देताना फडणवीसांनी हा गौप्यस्फोट केला. 


प्रश्न :महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर, राजकीय वैर आणि खासगी वैर असं काही नव्हतं. राजकीय वैर वेगळं आणि खासगी मैत्री वेगळी असायची. उद्धव ठाकरे आणि तुमची खास मैत्री होती. पण गेल्या अडीच वर्षात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून कटुता खूप वाढली आणि राजकीय वैर खासगी वैरात रुपांतरीत झालं, असं वाटतंय...


उत्तर : "मी राजकीय वैर ठेवत नाही. आमचं सरकार राजकीय वैरानं वाढणारही नाही. पण या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या, मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आलं होतं. अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं की, ज्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. पण कुठल्याही परिस्थितीत मला अडकवा आणि मला जेलमध्ये टाका, असे आदेश महाविकास आघाडी सरकारमधील होते. हेदेखील सत्य आहे. पोलीस प्रशासनातील कोणालाही विचारलं, तर तेदेखील हेच सांगतील."


देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आजही माझं त्यांच्याशी वैर नाही. पण मातोश्रीचे दरवाजे माझ्याकरता त्यांनी बंद केलेत. माझा फोनदेखील त्यांनी घेतला नाही. पाच वर्ष आपण ज्यांच्यासोबत काम करतो, ज्यांच्यासोबत सरकार चालवतो. कर्टसी म्हणून तरी, किमान फोन उचलून तुम्ही म्हणू शकता की, मला तुमच्यासोबत यायचं नाहीये. पण तुम्ही मातोश्रीचे दरवाजे हे माझ्याकरता बंद केले. याचं मला दुःख आहे."


शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार बजेटच्याच आधी होणार असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच, राज्यपालांच्या पदमुक्तीसंदर्भात बोलताना ते माझ्याशी खासगीत बोलताना अनेकदा मला पदमुक्त करा असे म्हणाल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. त्याचप्रमाणे राज्यातील सत्तांतर आणि सत्तासंघर्ष याबाबतही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. बाळासाहेब ठाकरे ही तुमची एकट्याची मालमत्ता नाही, असं म्हणत पुन्हा एकदा ठाकरेंवर फडणवीसांना निशाणा साधला. तर, भाजप-शिवसेना युती आणि शिवसेनेतील बंड याबाबत बोलताना मातोश्रीचे दरवाजे तुम्ही बंद केलेत, असंही देवेंद्र फडणवीस ठाकरेंना उद्देशून म्हणाले. 


एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमाचं कौतुक करत देवेंद्र फडणवीसांनी आपलं व्हिजन मांडण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील आमच्या महाराष्ट्र सरकारनं भविष्यातील महाराष्ट्र कसा असेल याची पायाभरणी करण्याचं काम सुरु केलं आहे. विशेषतः पायाभूत सुविधांवर आधारित विकास ही जागतिक संकल्पना घेऊनच आम्ही महाराष्ट्रात पुढे जात आहोत. नागपूर-मुंबई समृद्धी एक्सप्रेस महामार्ग केवळ एक रस्ता नाही, तर इकोनॉमिक कॉरिडोअर आहे. पुढच्या 20 वर्षांतील अर्थव्यवस्था ही या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तयार होणार आहे. 


तरुण, तडफदार, अभ्यासू आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला तेल लावलेला नवा पैलवान. अर्थात देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र भाजपचं निर्विवाद नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांचा विरोधी पक्षात असलेला वचक आणि वजन वाखाणण्याजोगं आहे. 2019 ते 2022 या तीन वर्षांच्या काळात मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री अशी तीनही पदं त्यांच्या नावामागे लागली. एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी करण्यामागे असलेल्या शक्तीचा उगम फडणवीसांपासूनच सुरु होतो हे वादातीत सत्य आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा, नगर नियोजन, शेती, सहकार आणि क्रीडा या सगळ्या विषयांमधील बारकावे जाणून कामं वायुवेगानं कशी करुन घेता येतील यात त्यांची हातोटी आहे. मात्र त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सरकारची इमेज स्वच्छ ठेवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. बेरोजगारी, महागाईचं संकट अधिक गहिरं होत असताना महाराष्ट्राला उद्योगांसाठी पूरक आणि आघाडीचं राज्य बनवण्यासाठी त्यांचं काय व्हिजन आहे? उद्धव ठाकरेंशी संबंध कायमचे नादुरुस्त राहणार का? अजित पवार आणि राष्ट्रवादीचा पर्याय कायमचा संपलाय का? अशा राजकीय प्रश्नांवर थेट बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी यांनी आपलं व्हिजन स्पष्ट केलं. 


महाराष्ट्रात (Maharashtra News) सध्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांचं संयुक्त सरकार आहे. मात्र, असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यानं पाहिलेलं अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा अद्याप थंडावलेल्या नाहीत. अशा तोफांचा सामना करतानाच राज्याच्या विकासात कसूर न करता राजकीय लढाई लढत राहणं हा समतोल सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही करावा लागत आहे. अशात पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राज्यातल्या सद्यस्थितीबाबत काय वाटतंय. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रगतीची दिशा कशी असेल. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी या नेत्यांचं व्हिजन काय असेल याबद्दल या सर्व नेत्यांशी आज दिवसभर आम्ही दिलखुलास संवाद साधणार आहोत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Majha Maharashtra Majha Vision LIVE Updates: 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' आज दिवसभर एबीपी माझावर, राजकीय नेतेमंडळींची उपस्थिती