Nashik Murder News : नाशिक (Nashik) शहरात हत्येचं सत्र थांबायचं काही नाव घेत नसताना शहरातील अंबड पोलीस (Ambad Police Station) हद्दीत खुनाची घटना समोर आली आहे. अंबड सातपूर लिंकरोडवरील (Satpur) संजीव नगरमध्ये हि खुनाची घटना घडली आहे. सदरे आलम शब्बीर शेख असे या वीस वर्षीय हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात (nashik District) गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून येवला तालुक्यातील धर्मगुरूंच्या (Khwaja Sayyad Chishti Murder) हत्येची घटना ताजी असतानाच आता नाशिक शहरात अंबड परिसरात परप्रांतीय कामगाराची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, चार जणांनी त्याचा गळा चिरुन हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच अंबड औद्योगिक परिसरात (Ambad MIDC Area) हत्येची घटना समोर आली होती. त्यानंतर आज पुन्हा एका कामगाराची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. चार जणांच्या टोळक्याने गेला चिरून सदर तरुणाची हत्या केली आहे. घटना घडली तेव्हा सदर तरुणाला वेळीच उपचार न मिळाल्याने अतिरक्तस्त्राव हाेऊन या तरूणाचा मृत्यू झाल्याचे समजते. यावेळी गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना उपस्थित नागरिक मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याने टायला वेळेवर मदत मिळू शकली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अशात जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या हत्येचा कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेतील अनोळखी टोळके पसार झाले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलीसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
घटनेने खळबळ
दरम्यान बिहार येथील हा नागरिक असून अंबड येथे कंपनीत कामाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. हत्या झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून पैशाचा वाद कि आणखी काही? याचा शोध पोलीस घेत आहेत.