Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील मखमलाबाद शिवारातील कालव्यात दुचाकीचा अपघाताचा बनाव रचत सख्या भावाचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा खून शेतजमीनीच्या वादातून झाला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर साहेबराव कराड कुटुंबासह कराड मळा मखमलाबाद (Makhamlabad) गावात राहत होते. तर त्यांचा लहान भाऊ दीपक साहेबराव कराड मखमलाबाद नाक्यावरील तेज प्रतीक सोसायटीत राहत होता. ज्ञानेश्वरकडे आई लंकाबाई राहत होत्या. दरम्यान ज्ञानेश्वर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने आईने दीपकला फोन करून ही माहिती दिली. दीपक ने शोध घेतला असता ज्ञानेश्वर दुचाकीसह गायकवाड मळ्यासमोर कालव्यात मृतावस्थेत मिळून आला. पोलिसांनी तपास केला असता हा खून असल्याचे समोर आले.
मखमलाबाद शिवारातील गंगापूर कॅनल रोडवर कोरड्या पाटात ज्ञानेश्वर साहेबराव कराड यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. ज्ञानेश्वर कराडच्या डोक्यावरील घाव शंकास्पद असल्याने तसेच घटनास्थळी अपघाताच्या खुणा नसल्याने कराड यांचा घातपात झाल्याचा संशयातून पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानुसार ज्ञानेश्वर कराड यांचा भाऊ व अन्य नातेवाईकांची जबाब नोंदवले असता त्यामध्ये तफावत आढळून आली. जबाबात तफावत आढळल्याने कराड यांचा खून झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
प्रॉपर्टीवरून वाद
वडील साहेबराव कराड यांनी 102 गुंठे जमीन मखमलाबाद कालव्याजवळ पहिल्या पत्नीच्या नावाने खरेदी केली होती. यातील सहा गुंठे जमीन विकून दीपकला फ्लॅट खरेदी करून दिला. तर चाळीस गुंठे जमीन दुसऱ्या पत्नीच्या नावावर करून दिली. तर 52 गुंठे जमीन पहिल्या पत्नीच्या नावावर ठेवली होती. दरम्यान संशयित दिपकने सावत्र आईच्या अडाणीपणाचा फायदा घेत 52 गुंठे स्वतःच्या नावावर करून घेतली. यामध्ये न्यायालयात दावा दाखल करून ज्ञानेश्वर सावत्र आईला मदत करीत जमीन परत मिळून दिली होती. यामुळेच दीपकने ज्ञानेश्वरचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले.
नेमकी घटना काय घडली?
ज्ञानेश्वर कराड हे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून मखमलाबाद शिवारातील कराड मळा येथील घरी जात असताना संशयित दीपक कराड त्याचा चुलत दाजी संशयित खंडू सानप व सानपचा मित्र रवी पिंपळे दबा धरून बसले होते. यावेळी दुचाकीवरून घरी निघालेला ज्ञानेश्वर कराड हा येथून जात असताना त्याच्या लक्षात ही बाब आली. त्याने या तिघांना पाहून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांनी त्याच्या डोक्यात लाकडी दांड्याने व लोखंडी सळईने वार केला. या हल्ल्यात ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाल्याने त्यानंतर दोघांनी त्याला उचलून त्याच्या दुचाकीवरून एका शासकीय नर्सरी जवळ कोरड्या पाटात दुचाकीसह फेकून देत अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. परंतु या प्रकरणात घातपाताचा संशय आल्याने पोलिसांनी ज्ञानेश्वरचा लहान भाऊ संशयित दीपक यास चौकशीसाठी ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविला. संशयित दीपक याने दाजी व दाजीच्या मित्रासह खून केल्याचे निष्पन्न झाले.