Nashik News :  नाशिक जिल्हा अपघातांच्या घटनांनी हादरला. वणी जवळ ट्रॅक्टर ट्रॉली आणि कराच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच इगतपुरी तालुक्यात आणखी एक अपघातात माय लेकींना जीव गमवावा लागला आहे. मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या पपाबाई राजेंद्र गोयकर (35) वर्षे मोनिका राजेंद्र गोयकर (15) वर्षे ह्या दोघी मायलेकींचा विहीरीत बुडून मृत्यू झाला.


इगतपूरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे हि घटना घडली आहे. येथील गावात कर्जत तालुक्यातील ताजु येथील मेंढपाळ काही दिवसांसाठी आले होते. काल दुपारच्या सुमारास या तांड्यातील माय लेकी मेंढ्याना पाणी पाजण्यासाठी येथील शेतकरी अरुण शंकर भगत यांच्या शेतात गेल्या. या ठिकाणी मोकळ्या पडीत भरलेल्या विहीरीत मेंढ्याना पाणी पाजत असताना मोनिकाचा पाय घसरुन ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आई पपाबाई गेली असताना तिचाही बुडून मृत्यू झाला. 


यावेळी काही अंतरावर उभ्या असलेल्या मुलाच्या हि गोष्ट लक्षात आली. त्याने गावातील लोकांना मदतीसाठी बोलवून गावातील पोलीस पाटलांना याबाबत माहिती दिली. पोलीस पाटलांनी सदर घटनेची माहिती वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार विलास धरणकर यांनी पट्टीचे पोहणार असणाऱ्या गोविंद तुपे यांना बोलवून त्यांनी पाण्याचा अंदाज घेऊन मायलेकीना विहिरीतुन बाहेर काढले. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माय लेकीचे मृतदेह पंचनामा करण्यासाठी घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. 


दरम्यान मेंढ्याना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या या मायलेकींचा दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मेंढपाळ आपला उदरनिर्वाह करण्यासाठी या गावारून त्या गावावर भटकंती करत असतात. मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेऊन आपली गुजराण करतात. मात्र अशा पद्धतीने या तांड्यातून दोन कर्ते हात गेल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे. 


वणी येथील भीषण अपघात 
नाशिक जिल्ह्यातील वणी जवळील मुळाणे बारीत भीषण अपघात झाला. यामुळे समस्त नाशिक जिल्हा हादरला. जवळपास सहा जणांचा मृत्यू या अपघातात झाला. अपघाताची माहिती मिळताच अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याचे चित्र होते.