Nashik ZP Election : नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) लक्ष लागून असलेल्या गट, गण प्रारूप रचनेचा आराखडा अखेर प्रसिद्ध  झाला असून यामुळे जिल्हा परिषद निवडणूकही चुरशीची होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 


नाशिक मनपा निवडणुकीचे (Nashik NMC Election) वारे वाहत असताना इच्छुकांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत प्रतीक्षा होती. अखेर या निवडणुकीसंदर्भातील महत्वाचा टप्पा पार पडला असून यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गत सहा महिन्यांपासून लागलेली प्रतीक्षा संपुष्ठात आली असून जिल्हा परिषदेच्या 84 गट आणि 15 पंचायत समित्यांच्या 168 गणांच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा प्रसिध्द झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात यावेळी 11 गट व 22गणांचा समावेश झाला आहे.11 तालुक्यांमधील पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या गटांमध्ये मोठे फेरफार होऊन नव्याने गट तयार झाले आहेत. यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या दिग्गजांची चांगलीच पंचायत झाली आहे. जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 08 जून पर्यंत हरकती व सुचना मागविण्यात आल्या आहेत.  
   
दरम्यान फेब्रुवारीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला नाशिक जिल्हा परिषदेच्या आराखडा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण प्रारुप रचनांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा आराखडा नव्याने जाहीर केला. नव्या प्रारूप आराखड्यानुसार गट व गणांच्या सीमारेषांमध्ये महत्वाचे बदल झाले आहे. गटांची संख्या 73 गटांवरून 84 झाल्याने 11 गट नव्याने वाढले आहेत. देवळा, नांदगाव, येवला व इगतपुरी या चार तालुक्यात एकही गट वाढला नसल्याने येथील गट व गण रचना जैसे थे आहे.


हे दहा गट, जिथे बदल झाला! 
पेठ, कळवण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, बागलाण, दिंडोरी, नाशिक व चांदवड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक वाढला आहे. निफाड तालुक्यातील ओझर गट रद्द झाल्याने तालुक्यांमधील 10 गटांची पुनर्रचना झाली आहे. मालेगाव तालुक्यात दोन गट वाढले आहेत. 


नव्या गटांची भर 
त्र्यंबकेश्वर तालुका पूर्वी तीन गट होते. यात एक गट वाढला आहे. ठाणापाडा गट रद्द होऊन बेरवळ व वाघेरा गट तयार झाला आहे. सिन्नर तालुक्यात पूर्वी 06 गट होते. यात एक गटाची वाढ झाली आहे. बागलाण तालुक्यात 07 गट होते. यात एक गट वाढला असून आता 08 गट तयार झाले आहेत. पठावे दिगर गट रद्द होऊन डांगसौदाणे व मुल्हेर हे नवीन गट तयार झाले आहेत. सुरगाण्यात पूर्वी तीन गट होते, यात एकाची वाढ होऊन चार गट तयार झाले आहेत. हट्टी गट रद्द होऊन भदर व बोरगाव हे नवीन गट अस्तित्वात आले आहेत. पेठमध्ये पूर्वी दोन गट होते, यात एक गट वाढला आहे. धोंडमाळ गट रद्द होऊन सुरगाणे व कुंभाळे हे नवीन गट अस्तित्वात आले आहे. दिंडोरी तालुक्यात पूर्वी 05 गट होते. यात एकाची वाढ झाली असून वरखेडा हा नवीन गट तयार झाला आहे.


चांदवड तालुक्यात पूर्वी 04 गटात एकाची वाढ होऊन धोंडाबे हा नवीन गट तयार झाला आहे. निफाड तालुक्यात पूर्वी 10 गट होते. त्यातील ओझर गट रद्द झाल्याने 10 गटांची पुनर्रचना झाली असून नव्याने पिंपळस गट तयार झाला आहे. नाशिक तालुक्यात एक गट वाढला असून आता 05 गट तयार झाले आहेत. पिंप्री सय्यद नवीन गट तयार झाला आहे. मालेगाव  तालुक्यात 07 गट होते, यात दोन गट वाढले आहेत. त्यामुळे तालुक्यात 09 गट तयार झाले आहेत. यात वडनेर गट रद्द झाला असून नव्याने अस्ताणे, वडेल, टाकळी हे गट तयार झाले आहेत. कळवण तालुक्यात 04 गट होते. यात एकाची वाढ झाली असून आता 05 गट तयार झाले आहेत. खर्डे दिगर गट रद्द झाला असून पुनद नगर व दळवट हे नवीन गट तयार झाले आहेत.