Kolhapur News : इयत्ता दहावी व बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी कोल्हापुरात (Kolhapur News) परीक्षा केंद्र परिसरात 21 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 या कालावधीत (ज्या दिवशी पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते सायं. 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू असणार आहे. यानुसार मोबाईल फोन व त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास/ वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहणार आहेत. हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना व त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नाही, असेही कांबळे यांनी कळविले आहे.


“कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार 


दरम्यान, राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे.  या अभियानात राज्याचा “नोडल अधिकारी” म्हणून शिक्षण आयुक्त यांना व प्रत्येक जिल्हाधिकारी यांना तसेच “समन्वयक अधिकारी” म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. 


“कॉपीमुक्त अभियान”राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे, यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्यात. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात यावे, असे निर्णय घेण्यात आले आहेत. 


दरम्यान, जनजागृती मोहीम शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या कार्यशाळा आयोजित करणे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद यांची जिल्हा दक्षता समिती नियुक्त करणे. माध्यमांद्वारे शाळा आणि पालकांशी संवाद साधणे यातून जनजागृती करण्यात येणार आहे. 


10 मिनिटे वाढवून मिळणार 


दरम्यान, पालकांसह विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहावी, बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढून मिळणार मिळणार आहेत. यापूर्वी प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे आधी आकलनासाठी वाचनासाठी दिल्या जात होत्या. मात्र, यामुळे कॉपीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला होता. त्यामुळे पेपरच्या आधीची दहा मिनिटे प्रश्नपत्रिका दिली जात नसल्याने पेपरनंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांनी, पालकांनी केली होती. ही मागणी मान्य करत बोर्डाच्या पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून दिली जाणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या