Raj Thackeray : राज्यात मागील महिनाभराच्या कालावधीत राजकीय क्षेत्रात मोठी घडामोडी घडली. शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडत शिंदे गटांनी सरकार स्थापन केले. तरी या सर्व घडामोडी राज ठाकरे (Raj Thackeray) हे आजारी असल्याने घराबाहेर नव्हते. मात्र आता शस्त्रक्रियेनंतर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे हे एक्शन मोडवर आले आहेत. ते लवकरच मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये (Nashik) जोरदार सभा घेणार असल्याचे समजते.


राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वी प्रकृती स्वास्थामुळे राजकारणापासून दूर होते. मात्र आता राज यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये नुकताच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत मनसैनिकांमध्ये स्फुरण ओतले.


दरम्यान काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव (Ganeshotsav) झाल्यानंतर ते सप्टेंबर च्या शेवटी नाशिकमध्ये (Nashik) वादळी सभा घेणार आहेत. मुंबईत झालेल्या मेळाव्यात त्यांनी आगामी काळात महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे सांगत मनसैनिकांना तयारीसाठी नियोजन करण्यास सांगितले. राज ठाकरे यांनी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. एकेकाळी याच नाशिककर मनसेने एकहाती झेंडा फडकवला होता, त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी राज यांचा नाशिक दौरा निर्णायक ठरणार आहे.


अमित यांची पायाभरणी
दरम्यान काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) हे चार दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते. त्यांनी नाशिक शहरासह जिल्हा पिंजून काढला. आणि मनसैनिकांमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण केली. खास करून महाविद्यालयीन तरुण तसेच युवा वर्गाशी थेट प्रश्न उत्तराच्या माध्यमातून खुला संवाद साधत त्यांनी त्यांचे प्रश्न जाणून घेतले तसेच त्यांना मनसेमध्ये सक्रिय होण्याचे आवाहनही केले होते.


नाशिकमध्ये मनसेचे राजदूत
अमित ठाकरे यांनी दौऱ्यात नाशिकमध्ये प्रत्येक ठिकाणी भेट देत प्रत्येक प्रभागात राजदूत तयार केले. मनसेने मतदार यादी निहाय राजदूत नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये मनसेचे विचार पोहचविण्यात येत आहेत. मुख म्हणजे आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांना डोळयांसमोर ठेवून मनसेने रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. 


राज ठाकरे तोफ कडाडणार
गेल्या काही महिन्यापासून राज यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्याचे पडसाद नाशिकमध्ये येऊन उमटले होते. भोंगे विरोधी आंदोलनामध्ये नाशिक मधील मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यामुळे आगामी राज ठाकरे यांच्या दौऱ्याची पदाधिकाऱ्यांसह सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.