Larry Ellison Net Worth : लॅरी एलिसन, 80 वर्षांच्या या व्यक्तीकडे कुठलीही पदवी नाही, तरीही संपत्ती मात्र 258.8 अरब डॉलरची. ओरॅकल कंपनीचे संस्थापक लॅरी एलिसन यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत आता दुसरा नंबर पटकावला आहे. अॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांना त्यांनी एकूण संपत्तीच्या स्पर्धेत मागे सोडलं आहे. 80 वर्षांचे लॅरी एलिसन यांचा इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.

Who Is Larry Ellison : कोण आहेत लॅरी एलिसन? 

एलिसन यांचा जन्म 17 ऑगस्ट 1944, न्यू यॉर्क सिटी येथे झाला. लॅरी हे काही पिढीजात श्रीमंत नव्हते. खरं तर लॅरी यांना लहानपणी एका महिलेनं दत्तक घेतलं. त्यानंतरही त्यांचं पूर्ण बालपण हे काही त्यांच्या दत्तक आईसोबत गेलं नाही. इतर नातेवाईकांच्या सानिध्यातच ते लहानाचे मोठे झाले. 

लॅरी यांनी कॉलेजमध्येच शिक्षण सोडून दिलं. 1966 मध्ये शिकागो विद्यापीठात पुन्हा प्रवेश घेतला. मात्र दुसऱ्यांदाही ते कॉलेजमधून बाहेर पडले. या काळात त्यांनी कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगचं प्रशिक्षण घेतलं. एम्पेक्स नावाच्या कंपनीत काही वर्षे नोकरी केली. रिलेशनल डेटा नावाच्या संकल्पनेचा बारकाईनं अभ्यास केला. त्यानंतर ओरॅकल नावानं स्वतःची कंपनी सुरु केली.

ओरॅकलची स्थापना केली

एलिसन हे Oracle चे सह-संस्थापक, कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) आहेत. एलिसन यांच्याकडे Oracle मध्ये सुमारे 41 टक्के हिस्सा आहे. त्यांच्या मालमत्तेमध्ये हवाई येथील लानाई बेटचा समावेश आहे. या बेटाची 98 टक्के मालकी ही लॅरी एलिसन यांच्याकडे आहे. या व्यतिरिक्त त्यांनी AI उपक्रमांमध्ये, Tesla आणि विविध रिअल इस्टेट संपत्तीतही गुंतवणूक केली आहे. 

Ellison Medical Foundation : चॅरिटी उपक्रम

लॅरी एलिसन यांचे चॅरिटी उपक्रम वैद्यकीय संशोधनावर केंद्रित आहेत. विशेषतः कर्करोग, वयोवृद्धतेचे आजार, आणि शारीरिक पुनर्वसन या तीन प्रमुख क्षेत्रात त्यांनी मोठी मदत केली आहे. ते AI‑आधारित निदान विस्तारून जगभरातील रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. Ellison Medical Foundation या संस्थेच्या मार्फत त्यांनी अनेकांची मोठी मदत केली आहे. 

पाहता पाहता या कंपनीचा कारभार इतका फोफावत गेला की इलॉन मस्क यांच्यापाठोपाठ श्रीमंतांच्या यादीत विराजमान होण्याचा मान लॅरी यांना मिळाला. श्रीमंतांच्या यादीत इलॉन मस्क यांनी आजही आपलं पहिलं स्थान निर्विवादपणे अढळ ठेवलं आहे. 

Top Three Richest Men : जगातील टॉप-थ्री श्रीमंत

इलॉन मस्क - पहिला नंबरसंपत्ती - 410.8 अरब डॉलर

लॅरी एलिसन - दुसरा नंबरसंपत्ती - 258.8 अरब डॉलर

जेफ बेझोस - तिसरा नंबरसंपत्ती - 226.8अरब डॉलर

कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना आणि कुठलीही औपचारिक पदवी नसताना केवळ अभ्यास, निरीक्षण आणि दूरदृष्टीच्या जोरावर कुठपर्यंत मजल मारता येते, हे लॅरी एलिसन यांनी जगाला दाखवून दिलं. यशस्वी होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य स्वप्नाळू तरुणासाठी लॅरी एलिसन यांच्या रुपानं एक नवा रोल मॉडेल मिळालाय, एवढं मात्र नक्की.

ही बातमी वाचा: