छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. इन्स्टाग्रामवर सध्या एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे. 93 वर्षांचे आजोबा, आजी यांचा हा व्हिडिओ असून तो एका ज्वेलरी शॉपमधील आहे. या व्हिडिओत त्या दुकानाचे मालक देखील पाहायला मिळतात. या व्हिडिओतील आजी आजोबांचा संवाद नेटकऱ्यांना भावूक करतो. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला असून जवळपास 17 मिलियन Views या व्हिडिओला मिळाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील गोपिका ज्वेलरी या दुकानातील हा व्हिडिओ आहे.
गोपिका ज्वेलरी संभाजीनगरच्या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यासह इतर नेटकऱ्यांनी देखील त्यांच्या अकाऊंटवरुन व्हिडिओ पोस्ट केलाय. प्रामाणिकपणा, प्रेम, भावनिकता, माणुसकी या सर्वांचं मिश्रण या व्हिडिओत पाहायला मिळतं.
व्हिडिओच्या सुरुवातीला ज्वेलर्सचे मालक आणि आजोबांमधील संवाद ऐकायला मिळतो. त्यात त्या दाम्पत्याला ज्वेलर्सनं 93 वर्षांचे आजोबा आणि आजी कुठल्या असल्याचं विचारलं. यावर त्यांनी जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील असल्याचं उत्तर दिलं. यासोबत एक जुनी घटना देखील या संवादात समजते. ज्यामध्ये दुसऱ्या एका दुकानातील विक्रेत्या महिलेचा गैरसमज झाला होता, असं ज्वेलर्सनं म्हटल्याचा संवाद या व्हिडिओत आहे.
आजोबांनी आजींसाठी माळ आणि वाटी घेतली असल्याचं सांगितलं. आजींकडे 1100 रुपयांपेक्षा पेक्षा जास्त पैसे होते. आजोबांनी काही पैसे कापडात गुंडाळून आणले होते. ज्वेलर्सकडून पैसे न घेता दागिने देण्याचा प्रयत्न केला जात होता. तेव्हा आजोबा आणि आजी पैसे देण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर आजोबांनी आणि आजींनी ज्वेलर्सची विनंती मान्य करत काही तर रक्कम घ्यावी, असं म्हटलं. यानंतर ज्वेलर्सनं 20 रुपये घेत ते जपून ठेवणार असल्याचं म्हटलं. पांडुरंगाचे आणि तुमचे आशीर्वाद असल्यानं काय कमी पडतंय, असं ज्वेलर्सनं म्हटल्याचं व्हिडिओत ऐकायलं मिळतं. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
दरम्यान, आजी आजोबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर भावनिक होत प्रतिक्रिया दिल्या आहेत. 93 वर्षांच्या आजोबांचं आजींवरील प्रेम, ज्वेलर्सनं दाखवलेला मनाचा मोठेपणा याबद्दल नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही जणांनी दागिन्यांची पुढील खरेदी या दुकानातून करणार असल्याचं म्हटलं.