Jalgaon News : जळगाव दूध संघात (Jalgaon Milk) झालेल्या अपहाराला खडसे परिवार जबाबदार असून त्याचे सर्व पुरावे आपल्याकडे असून येत्या आठ दिवसांत आपण या संदर्भात पोलिसात तक्रार देणार असल्याचा इशारा विद्यमान अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांनी दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जळगाव दूध संघात मागील काळात मंदाताई खडसे (Mandatai Khadse) अध्यक्ष पदावर असताना दूध संघात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला असल्याच्या तक्रारी आपण केल्या होत्या. या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले असून या संदर्भात आपण पुराव्यांनिशी माध्यमाच्या समोर आणणार असून त्या संदर्भात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा विद्यमान अध्यक्ष आ मंगेश चव्हाण यांनी दिल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.
दूध संघात दीड कोटी रुपयांचा अपहार
जळगाव (Jalgaon) जिल्हा दूध संघात काही दिवसांपूर्वी संचालक मंडळ बरखास्त होऊन शिंदे फडणवीस सरकारने प्रशासक मंडळ नेमलं होतं. प्रशासक मंडळाने दूध संघात सुमारे दीड कोटी रुपयांचा लोणी आणि दूध पावडरचा अपहार झाल्याचं समोर आलं. यानंतर दूध संघ प्रशासनाने शहर पोलीस ठाण्यात अपहाराची तक्रार दाखल केली होती. आता आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) हे स्वतः खडसे कुटुंबीयांविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे ते म्हणाले आहेत. आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, जळगाव दूध संघ घोटाळा प्रकरणी येत्या आठ दिवसांत आपण पोलिसात तक्रार देणार असून खडसे परिवारामुळेच दूध संघात आर्थिक अपहार झाला आहे. जळगाव दूध संघात नुकतीच काही कर्मचाऱ्यावर निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली होती.
दूध संघाच्या हिताच्या दृष्टीने अतिरिक्त कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला
या संदर्भात आ मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे की, खडसे परिवाराने गरज नसताना आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी त्यांना दूध संघात घेतले होते. त्याचा अतिरिक्त आर्थिक भार हा दूध संघावर होत होता. अनेक कर्मचारी तर कधीही दूध संघात आले नव्हते. अशा कर्मचाऱ्यांना ही पगार मिळत होता, मात्र दूध संघ वाचवायचा असेल तर अनावश्यक होणारा खर्च टाळला जावा, यासाठी अनेक खर्चात कात्री लावण्यात आली आहे. त्यात अतिरिक्त कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध संघाच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. यात राजकीय हेतू नसल्याचं मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे. यातील वाचलेली रक्कम आम्ही थेट दूध उत्पादकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचा परिणाम म्हणून दूध संघाचे उत्पन्न वाढले आहे, असंही आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटल आहे.
दरम्यान येत्या आठ पंधरा दिवसात पुराव्या निशी आम्ही पोलिसात जाणार असल्याने खडसे परिवाराची भागमभाग चालू होणार असल्याचा इशाराही आ. मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.
संबंधित बातमी