Nashik Nitin Gadkari : काश्मीर ते कन्याकुमारी जाण्यासाठी महाराष्ट्रातील सोलापूर त्यानंतर कन्नूर, त्रिवेंद्रम, हैदराबाद, बंगलोर, कन्याकुमारी (Kanyakumari) असा प्रवास होत होता. मात्र आता मुंबई पुण्याला किंवा सोलापूरला जायची गरज नाही. आता नाशिकवरुन कन्याकुमारी प्रवास करता येणार आहे. त्यामुळे थेट नॉर्थचे साऊथशी कनेक्शन नाशिकवरुन (Nashik) होणार आहे. त्यामुळे लवकरच काश्मीर आणि कन्याकुमारी या नेटवर्कला नाशिक जिल्हा जोडला जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्यामुळे आता काश्मीर ते कन्याकुमारी सोलापूर नाहीतर नाशिकवरुन देखील जाता येणार आहे. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आज नाशिक दौऱ्यावर असून नाशिक (Nashik) जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल व्हील डिस्प्ले संकल्पनेतून नाशिक शहरात पहिल्यांदाच ऑटो अँड लॉजिस्टिक एक्स्पोचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, "लवकरच काश्मीर आणि कन्याकुमारी या नेटवर्कला नाशिक जिल्हा जोडला जाणार आहे. सद्यस्थितीत डिझेल हे प्रदूषणकारी आणि कॉस्टली इंधन आहे. इलेक्ट्रिक ट्रक फारच स्वस्त आहे..जिथे 100 रुपये डिझेल लागते, तिथे 10 रुपये इलेक्ट्रिक लागेल. यामुळे येणाऱ्या काळात आपली लॉजिस्टिक कॉस्ट असणार जगात सर्वात जास्त म्हणजेच 16 टक्के असणार आहे. यानंतर सर्व ट्रक एलएनजी आणि सीएनजी, इथेनॉल आणि बायोगॅसवर चालणार असल्याचे ते म्हणाले. 


ते पुढे म्हणाले की, मला खूप आनंद आहे की, वाहतुकीमध्ये परिवर्तन होत आहे. डिझेल ट्रक फार काही परवडत नाही. येणाऱ्या काळात ट्रान्सपोर्ट असोसिएशनने शहराच्या बाहेर ट्रक थांबवण्यासाठी जागा तयार करावी. ज्यामुळे ट्रॅफिक होणार नाही. नाशिकमधील द्वारका येथे डबल डेकर ब्रिज होईल. लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून नाशिकला बनवण्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुढाकार घ्यावा. यासाठी नाशिक महापालिकेला याबाबत प्रस्ताव द्यावा, म्हणेजच बाहेरच्या बाहेर ट्रक थांबतील आणि वाहतूक कोंडी होणार नाही, आमचा विभाग त्यासाठी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. 


भारतीय संरक्षण दलाची ताकद दाखवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन


केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नाशिकच्या ईदगाह मैदानावर आयोजित 'नो युअर आर्मी' (Know Your Army) या भारतीय संरक्षण दलाची ताकद दाखवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गडकरींसमवेत मंचावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खनिकर्म मंत्री दादा भुसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी त्यांनी प्रदर्शनातील शस्त्रास्त्रांची पाहणी केली. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, एक काळ असा होता की, आपण शस्त्र आयात करायचो. पण मोदीजींच्या नेतृत्वात मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया उपक्रम सुरु झाले आहे. एक काळ असा होता की, आपण सगळं काही आयात करत होतो. आता आपण संरक्षण साहित्य निर्यात करतो. आपले शुर सैनिक जे कार्य करतात, ते जे सामग्री वापरतात, याची माहिती जनतेला व्हावी, म्हणून याचे आयोजन झाले आहे. अतिशय हुशार विद्यार्थी सैन्य दलाकडे वळत आहे. आज डिफेन्समध्ये जे संशोधन सुरु आहे, त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती होईल. नागपूरला जे राफेल एयरक्राफ्ट आहे, तिथे मुलांना रोजगार मिळत आहे. नागपूरला फाल्कन जेट देखील तयार होणार आहे. नाशिकमध्ये देखील डिफेन्सबाबत उत्पादनासाठीसाठी वाव आहे. येणाऱ्या काळात आपण आपल्या सीमांचे रक्षण तर करुच, पण सामर्थ्य झाल्याने कुठलेही राष्ट्रकडे वाकडी नजर ठेऊन आपल्याकडे बघू शकणार नाही. यात तिन्ही सेनांचे योगदान असंल्याचे गडकरी म्हणाले.