Nashik Nagar News : अलीकडे मुलांची लग्न (Marriege) जुळत नसल्याचे प्रकार समोर येत असून दुसरीकडे याच गोष्टीचा फायदा घेऊन काही जणांनी नवऱ्या मुलासह त्याच्या कुटुंबाला गंडा घालवण्याचा जणू धंदाच सुरू केला आहे. याचा फटका अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील कोळगाव येथे कोरडे कुटुंबाला बसला आहे.
नगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील लग्न करून आणलेल्या नव्या नवरीने चक्क दागिने आणि रोख घेऊन पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेवगाव (Shevgoan) तालुक्यातील कोळगाव येथील एका वडिलांना त्यांच्या मुलासाठी सोयरीक दाखवून मुलीला आई-वडील नसल्याने तिचा सांभाळ करणाऱ्या तथाकथित मावशीला व मध्यस्थाला चक्क दोन लाख मोजावे लागले. नवरी मुलाच्या घरी आल्यावर घरातील रोख तीस हजार रुपये आणि दागिने घेऊन नवरीने घरातून भल्या पहाटे पोबारा केल्याची घटना घडली.
शेवगाव तालुक्यातील कोळगाव येथील ऊसतोड मजूर अंकुश कोरडे (Ankush Korde) यांच्या घरी ही घटना घडली आहे. कोरडे कुटुंबीय दिवसभर रात्र काबाड कष्ट करून आपला मुलगा अंकुश कोरडे यांच्यासाठी लग्न जुळविण्याचे काम सुरु होते. अशातच कोरडे कुटुंबियांना त्यांच्याच ओळखीतील एका व्यक्तीने मुलगी दाखवली. नगर तालुक्यातील बायजाबाई जेऊर येथील दीक्षा कदम हिला लग्नासाठी पाहायला ते गेले. मात्र, मुलीला कुणीच नाही, तुमची तयारी असल्यास लगेच लग्न लावून देतो म्हणत मुलीच्या तथाकथित मावशी मीराबाई जाधव आणि मध्यस्थी संभाजी ब्राह्मणे यांनी आग्रह धरला. 20 जानेवारीला दीक्षा कदम हिच्याशी अंकुश कोरडे यांचा साधेपणाने विवाह झाला...
दरम्यान सर्वकाही सुरळीत सुरू होतं. मात्र मुलीला आई-वडील नसल्याने तिचा आम्हीच सांभाळ केला. म्हणून आम्हाला दोन लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी तिच्या मावशी मीराबाई जाधव आणि मध्यस्थी संभाजी ब्राह्मणे यांनी केल्याचे अंकुशचे वडील पंडित कोरडे यांनी सांगितले. त्यामुळे मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, म्हणून अंकुशच्या घरच्यांनाही दोन लाख रुपये टप्प्याटप्प्याने दिले. मात्र, लग्नानंतर सात दिवसात पहाटेच्या वेळी दीक्षा घरातून निघून गेली. सुरुवातीला तर कोरडे कुटुंबियांनी शोधाशोध केली...मात्र ती मिळून आली नाही. तर गावातीलच यशवंत कोरडे यांनी तिला कुणाच्यातरी मोटारसायकलवर जाताना पाहिले होते, मनात शंका आल्याने त्यांनी घरात उचका पाचक केली तर घरातील 30 हजारांचे सोन्याचे दागिने आणि 30 हजार रुपयांची रोकड घेऊन दिक्षाने पोबारा केला होता.
दोन लाख 60 हजाराची फसवणूक
कोरडे कुटुंबाने लग्न जुळवून देणाऱ्या व्यक्तीला गाठले , तर संबंधित व्यक्ती उडवा- उडवीची उत्तरं देत असल्याचा आरोप कोरडे कुटुंबाने केला आहे...कोरडे कुटुंबाने बायजाबाई जेऊर या दीक्षाच्या कथित मावशीच्या घरी जाऊन पाहिले तर घराला कुलूप होते. नंतर चौकशी केली असता ती खोली देखील त्यांची नसून पैसे देऊन काही दिवसांसाठी त्यांनी खोली घेतली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट शेवगाव पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. दीक्षा कदम, मध्यस्थी संभाजी ब्राह्मणे, दिक्षाची कथित मावशी मीराबाई जाधव आणि तिची बहीण यांनी खोटा बनाव करून कोरडे कुटुंबाची दोन लाख 60 हजाराची फसवणूक केल्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या भागात अनेक कुटुंब हे ऊसतोड मजुरी करत असल्याने मुलींना काम करावे लागते. त्यामुळे इथल्या मुलांना मुली देण्यास नकार दिला जात असल्याचे सांगण्यात आलं.