Minister Dr. Bharti Pawar : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Minister Dr. Bharti Pawar) यांचा साधेपणा आज पुन्हा एकदा बघायला मिळाला. डॉ. पवार या नाशिक (Nashik) दौऱ्यावर असतांनाच त्यांच्या परिचयाचे असणारे शेतकरी शिवाजी मोरे यांच्या घरी त्यांनी हजेरी लावली. मोरे यांच्या लेकीचा विवाहसोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने घरी पुऱ्या लाटण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि हे बघताच मंत्रीमहोदयाही या महिलांसोबत सहभागी झाल्या आणि 'सई बाई ग बाई' गाण्याच्या तालावर त्यांनीही पुऱ्या करण्याचा मनसोक्त आनंद लुटला.


केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा यापूर्वी देखील एक विडिओ व्हायरल झाला होता. त्या दिंडोरीकडे जात असताना वाटेत रसाचे गुऱ्हाळ त्यांनी चालविले होते. त्यावेळी देखील त्यांनी रसाचे गुऱ्हाळ चालवून सर्वाना आश्चर्यचकित केले होते. आज पुन्हा एका लागण समारंभात जेवण बनविणाऱ्या महिलांसमवेत बसून त्यांनी पुऱ्या लाटण्याचा आनंद घेतला आहे. 


चांदवड तालुक्यातील (Chandwad) देनेवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रगतिशील शेतकरी शिवाजी मोरे यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त डॉ. पवार यांनी हजेरी लावली. यावेळी लग्न घर म्हटलं धावपळ, लग्नाची घाई गडबड, घरात आप्त स्वकीयांचा वावर, लग्नाच्या विविध प्रथेप्रमाणे सर्व गोष्टींची तयारी ही होत असते. वऱ्हाडीना जेवण खावणं बनविण्यासाठी घराची मंडळी कामात असते. दरम्यान लग्न सोहळ्यात गेलेल्या डॉ. पवार यांनी देखील जेवण बनविणाऱ्या महिलांसोबत बसून पुऱ्या लाटण्याचा आस्वाद घेतला. 


दरम्यान यावेळी त्यांनी लग्नघरी जाऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी योगायोगाने पुऱ्या लाटण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्याठिकाणी मंत्रीमहोदया आपला कुठलाही बडेजाव न दाखवता पुऱ्या लाटण्यासाठी बसल्या. मग सर्वांच्या उत्साहाला उधानच आले. त्यातही बसलेल्या महिलांनी लग्नाची गाणी म्हणण्यास सुरवात केली. हा सर्व माहोल ऐकून नवरी मुलगी येऊन बसली. सर्वच पुऱ्या लाटण्यात मग्न झाले. आपल्या मुलीच्या लग्नात स्वतः मंत्रीमहोदया आठवणीने आल्या आणि घरच्या महिलांसोबत कार्यक्रमात सहभागी झाल्या हे बघून नवऱ्या मुलीच्या बापाचा उर आनंदाने भरून आला.


डॉ. पवार एवढ्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा कुठलाही गर्व बडेजाव न मिरवता आपले पाय जमिनीवरच असल्याचे या प्रसंगातून दाखवून दिले. मंत्री पवार यांच्या पुऱ्या लाटण्याची चर्चा असून हा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे.